पनवेल : कल्हे गावात गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम

पनवेल : विक्रम बाबर : कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कल्हे गावातील दर्गाह जवळ गुप्तधनाच्या लालसेने काही अज्ञात व्यक्तींनी गुपचूप खोदकाम सुरू केले होते. ग्रामस्थांनी हा डाव उधळून लावत घटना उघडकीस आणली. त्यामुळे संबंधितांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.
पैशांचा पाऊस, गुप्तधन त्याचबरोबर नरबळी यासारख्या घटना महाराष्ट्रभर घडतात. काही वर्षांपूर्वी पनवेल तालुक्यातच पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तीन जणांचा बळी देण्यात आला होता. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात तसेच एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना असे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत.
जुनाट विचार आणि अंधश्रद्धा आजही अनेकांच्या मानसिकतेत घर करून आहे. कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायत मधील कल्हे गावात दर्गाह आहे. या ठिकाणी गुप्तधन असल्याच्या लालसेमुळे काही व्यक्तींनी येथे खोदकाम करण्यास सुरुवात केली. या धनातून आपण गडगंज आणि श्रीमंत होवू अशा प्रकारचा समज संबंधितांचा होता. कार आणि रिक्षाने गुप्तधन खोदण्यासाठी लोक या ठिकाणी आले होते. मात्र ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्या व्यक्तींनी तेथून पळ काढला. नागरिकांनी नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल करून ही माहिती दिली. यासारखे या अगोदरही दोन-तीनदा प्रकार घडले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
बळी देण्याचा होता डाव?
गुप्तधनासाठी नर बळी दिले जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्हे गावात अशाच प्रकारे गुप्तधनासाठी खोदकाम हाती घेण्यात आले होते. मात्र वेळीच गावकऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्याने संबंधितांनी तेथून पळ काढला. अन्यथा यासाठी नरबळी सुद्धा देण्याची शक्यता होती. मात्र नागरिकांच्या दक्षतेमुळे पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा :
BRSच्या आमदार लस्या नंदिता यांचे कार अपघातात निधन
कोट्यवधींचे ड्रग्ज; सांगली हादरली!
५० वर्षांनंतर अमेरिकेचे मून लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले
Latest Marathi News पनवेल : कल्हे गावात गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम Brought to You By : Bharat Live News Media.
