हैदर शेखच्या माध्यमातून कुरकुंभच्या मेफेड्रॉनचे वितरण

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कुरकुंभमधील औद्योगिक वसाहतीतील अर्थ केम लॅबोरेटरीत तयार झालेले मेफेड्रॉन या गुन्ह्यातील आरोपी हैदर शेखच्या माध्यमातून वितरित होते. तर, सांगलीतून पकडण्यात आयुब अकबरशाहा मकानदार (वय 48, रा. कुपवाड) याच्याकडून तब्बल 148 किलो मेफेड्रॉन जप्त केल्याची माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी गुरुवारी (दि. 22) न्यायालयात दिली. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. सोमवार पेठ, खडीचे मैदान), अजय अमरनाथ करोसिया (वय 34, रा. भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. विश्रांतवाडी), भीमाजी ऊर्फ परशुराम साबळे (वय 46, रा. पिंपळे सौदागर, मूळ श्रीगोंदा), युवराज बब्रुवान भुजबळ (वय 41, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) आणि आयुब अकबरशाहा मकानदार (वय 48, रा. कुपवाड) असे अटक केलेल्या
आरोपींची नावे आहेत.
मकानदार याला गुरुवारी (दि 22) अटक केली आहे. तर दिल्लीतून पोलिसांनी आणखी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांनाही पुण्यात आणण्यात येत आहे. वैभव माने, अजय करोसिया आणि हैदर शेख यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. आरोपींना या गुन्ह्यासाठी कोणी पैसै पुरविले, तसेच त्यांनी राज्यात आणि देशात कोणत्या ठिकाणी मेफेड्रॉनचा पुरवठा केला, याचा तपास करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा आसलेकर यांनी केला. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी माने, करोसिया, हैदर आणि मकानदार यांना 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर साबळे आणि भुजबळ यांना यापूर्वीच 29 फेब—ुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखा एकच्या अमली पदार्थ विरोध पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
1750 किलोहून अधिक मेफेड्रॉन जप्त
विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि कुपवाड, दिल्लीत केलेल्या कारवाईत पुणे पोलिसांनी तब्बल साडेसतराशे किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील किंमत साडेतीन हजार कोटींहून अधिक असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुण्यात आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा
येरवडा कारागृहात मुरतंय ड्रग्जचं पाणी; फॉर्म्युला निर्मिती ते तस्करीचे नियोजन
विराट कोहली- बापमाणूस..!
दीर्घकाळ सत्तेत राहूनही काँग्रेसला देशातील गरिबी हटविता आली नाही : जे. पी. नड्डा
Latest Marathi News हैदर शेखच्या माध्यमातून कुरकुंभच्या मेफेड्रॉनचे वितरण Brought to You By : Bharat Live News Media.
