येरवडा कारागृहात मुरतंय ड्रग्जचं पाणी; फॉर्म्युला निर्मिती ते तस्करीचे नियोजन
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ड्रग्जमाफिया ललित पाटील असो की, कुरकुंभ अर्थ केम लॅबोरेटरीज ड्रग्ज रॅकेट प्रकरण… या दोन्ही प्रकरणात येरवडा कारागृह हे ठिकाण सारखंच आहे. याच येरवडा कारागृहातून ललितने ड्रग्ज रॅकेट कार्यरत ठेवले होते. तर अर्थ केम रॅकेटचा मास्टरमाईंड संदीप धुनिया यानेदेखील हेच केले. येरवडा कारागृहात ओळख झालेल्या एनडीपीएसच्या गुन्ह्यातील आरोपींशी संधान बांधून त्याने पुणे व्हाया दिल्ली, लंडन ड्रग्जचा बाजार मांडला. त्यामुळे येरवडा कारागृहातच ड्रग्जमाफिया आणि त्यांच्या पंटर लोकांत पाणी मुरत असल्याचे दिसून येतंय.
कारागृहातील सापडणारे मोबाईल चिठ्ठीद्वारे आपल्या साथीदारांना दिले जाणारे संदेश, मारामारी, खून यासारखे प्रकार येरवडा कारागृहात आता नवीन नाहीत. येरवडा कारागृहात विविध आरोपी बंदी आहेत. त्यामध्ये अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार केलेल्या कारवाईतील आरोपी आहेत. ललित पाटील हा देखील येरवडा कारागृहात एनडीपीएसच्या गुन्ह्यात बंदी होता. पुढे उपचाराच्या नावाखाली तो ससून रुग्णालयात दाखल झाला. त्याने भाऊ भूषण पाटील याच्या साथीने नाशिकमध्ये मेफेड्रॉनचे उत्पादन सुरू केले. त्याचे वितरण करण्यासाठी त्याने ज्या साथीदाराची निवड केली तो देखील येरवडा कारागृहातच होता.
तेथे दोघांचा परिचय झाला. हाच तो सुभाष मंडल. त्यानंतर ललितला ड्रग्ज तयार करण्याचा फॉर्म्युला अरविंदकुमार लोहरे याने दिला. पुण्यातील गुन्ह्यातही त्यानेच या सर्वांना ड्रग्ज बनविण्याचा फॉर्म्युला दिल्याचे समोर आले होते. ललितने हे सर्व येरवडा कारागृह आणि ससून रुग्णालयातून केले होते. आता अर्थ केम ड्रग्ज रॅकेट झाले तर मास्टर माईंड संदीप धुनिया 2016 च्या एनडीपीएसच्या कुरकुंभ येथील गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंद होता. तर सांगलीत अटक केलेला आयुब मकानदार हा देखील त्याच्याच सोबत येरवड्यात होता. यापूर्वी अटक केलेले हैदर शेख आणि वैभव माने हे देखील येरवडा कारागृहात विविध गुन्ह्यात बंदी होते.
ललित पाटील आणि अर्थ केम या दोन्ही रॅकेटमध्ये येरवडा कारागृहाचे साम्य आहे. येरवडा कारागृहात असताना या सर्वांनी बाहेर पडल्यानंतर पुन्हा ड्रग्ज निर्मितीचे रॅकेट सक्रिय करून तस्करी करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मकानदार, हैदर या दोघांनी मालाची डिलिव्हरी देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मकानदार हा तब्बल आठ वर्षे येरवडा कारागृहात बंद होता. 2023 मध्ये तो जामिनावर बाहेर आला. अर्थ केममध्ये तयार झालेला माल त्याने कुपवाड औद्योगिक वसाहतीतील एका खोलीत साठवून ठेवला होता.
हैदर आणि मकानदार या दोघांनी मीठाच्या गोदामाचा आसरा घेत ड्रग्ज तस्करी केली. एकंदर या दोन्ही प्रकरणावरून अंदाज येतो की, विविध गुन्ह्यांतील कैदी येरवडा कारागृहात एकत्र आल्यानंतर बाहेरचे रॅकेट चालवितात. प्रामुख्याने यामध्ये अमली पदार्थ तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येते. भारतीय तस्करांबरोबच त्यांना साथ मिळते ती नायझेरिअन अमली पदार्थ तस्करांची. दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या सर्व संशयित आरोपींची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या पंटरांची माहिती घेतल्याचे समजते. दरम्यान, राज्यातील ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे खोदून काढायची असतील तर यापुढे येरवडा कारागृहात एनडीपीएसच्या गुन्ह्यात बंदी असलेल्या कैद्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल, हे मात्र नक्की.
हेही वाचा
पोलिस बनून बहिणीला कॉपी पुरवायला आला अन् गजाआड झाला
Manohar Joshi : मनोहर जोशी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले : संजय राऊत
दीर्घकाळ सत्तेत राहूनही काँग्रेसला देशातील गरिबी हटविता आली नाही : जे. पी. नड्डा
Latest Marathi News येरवडा कारागृहात मुरतंय ड्रग्जचं पाणी; फॉर्म्युला निर्मिती ते तस्करीचे नियोजन Brought to You By : Bharat Live News Media.