Pune Drugs Racket : मास्टरमाईंड काठमांडूमार्गे कुवेतला पळाला
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड संदीप धुनिया असल्याचे समोर आले आहे. 2016 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत तो प्रमुख आरोपी होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुरकुंभ एमआयडीसीतच ही कारवाई करण्यात आली होती. 159 किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. त्याला भारतात येण्यासाठी व्हिजाची गरज नाही. त्याच संधीचा फायदा घेत त्याने ड्रग्ज रॅकेट चालविण्याचा धंदा सुरू केला. 30 जानेवारीलाच तो नेपाळमधील काठमांडूमार्गे कुवेतला पळाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
संदीप धुनिया हा मूळचा बिहारचा. त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. बिपीन कुमार हा त्याचा मित्र होता. तो सध्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. सोनम पंडीत ही बिपीन कुमारची पत्नी आहे. मात्र, धुनिया याने तिला गर्लफ्रेंड बनविले. याबाबत बिपीनच्या वडिलांनी तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी साडेसतराशे ते अठराशे किलो इतके मेफेड्रॉन जप्त केले आहे. यामध्ये आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय 40, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसीया (35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (वय 46,रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब—ुवान भुजबळ (वय 41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम, मुंबई) यांना अटक केली आहे. तर दिल्लीतून दिवेश भुतीया (वय 39) आणि संदीप कुमार (वय 42, दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले असून, दोघांनाही ट्रान्झिट रिमांडद्वारे पुण्यातील न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे. तर आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक केली असून, त्याच्याकडून 300
कोटींचे 145 किलो ड्रग्ज जप्त केले आहे.
कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबरोटरीज येथे छापा टाकल्यानंतर पुणे पोलिसांना तेथून देशातील विविध भागांत मेफेड्रॉन पाठविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दहा ते पंधरा पथके तयार करून पोलिसांनी दिल्लीसह राज्यातील विविध भागांत छापे टाकले. या वेळी दिल्लीत मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला. दररोज दहा-दहा किलोच्या पॅकेटने फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून मेफेड्रॉन लंडनला पाठविले जात होते. मागील दोन वर्षांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. विदेशात मेफेड्रॉनची विक्री करण्याची मदार धुनियावर होती. धुनिया यानेच मुंबईतील एका व्यक्तीशी संपर्क केला होता. तर मकानदार हा धुनिया सोबत 2016 च्या ड्रग्जच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जेरबंद होता. पोलिसांनी या रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी कंबर कसली आहे. सुरुवातीला पोलिसांनी डिलिव्हरी करणार्यांची साखळी उद्ध्वस्त केली. त्यानंतर निर्मिती करणारे युनिट आणि साठवणूक करणारी ठिकाणे शोधून काढली. या गुन्ह्यात आणखी चार ते पाच जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कारवाईची टांगती तलवार
ड्रग्ज मुक्त भारतासाठी केंद्राबरोबरच राज्य शासनाने देखील कंबर कसली आहे. याबाबतचे कायदे आणि नियम कडक करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी तीन ते चारवेळा कुरकुंभ एमआयडीसीत अमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीत कोणत्या कारखान्यात कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतले जाते, ते घेण्यासाठी निर्धारित नियमावली काय आहे, याबाबतच्या तपासणी करण्याचे काम स्थानिक पोलिस एफडीए, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. मात्र, तीन ते चारवेळा येथील औद्योगिक वसाहतीत अमली पदार्थाची निर्मिती करण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतरदेखील त्यांनी हा प्रकार किती गांभीर्याने घेतला हा सवाल आहे. नुकताच पुणे पोलिसांनीदेखील या सर्व विभागांशी पत्रव्यवहार केला आहे.
एनसीबी- एनआयएचे पुणे रॅकेटवर लक्ष
आतापर्यंतच्या देशातील अमली पदार्थाच्या बाबतीत करण्यात आलेल्या कारवाईत पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचा क्रमांक एकवर समावेश आहे. त्यामुळे देशातील नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी), एटीएस, एनआयए यासारख्या राज्याबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी (दि.22) एनसीबीचे पथक पुण्यात दाखल झाले. त्यांनी या सर्व प्रकरणाची माहिती पुणे पोलिसांकडून घेतली. दरम्यान, अमली पदार्थाची तस्करीच्या माध्यमातून मोठी रक्कम जमा केली जाते. ही रक्कम हवाला मार्फत फिरवली जाते. तसेच, यातील पैसे टेरर फंडिंग म्हणजेच दहशतवादी कृत्यासाठी वापरले जातात. त्यामुळे या सर्व तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याची कारवाई सुरू आहे. आणखी काही आरोपींना अटक होईल. संदीप धुनिया हा आतापर्यंत याप्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे दिसून आले आहे. आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला आम्ही जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.
संशयित कंपन्यांवरील छापेमारीत हवे सातत्य
सोलापूर जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये आहे का, याचा तपास करण्यासाठी सोलापूर पोलिसांचे पथक कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात दाखल झाले होते. येथील समर्थ लॅबोरेटरी व सुजलाम केमिकल या दोन कंपन्यांत पोलिसांनी चौकशी केली. मात्र, काही निष्पन्न झाले नाही. असे असले तरी कुरकुंभमधील संशयित कंपन्यांवर पोलिसांनी छापेमारीत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. कुरकुंभमधील अर्थकेम कंपनीवर मंगळवारी (दि. 20) पुणे पोलिसांनी छापा टाकून 1 हजार 100 कोटी रुपयांचे 550 किलो मेफेड्रॉन (एमडी ड्रग्ज) जप्त केले होते.
या घटनेमुळे पोलिस प्रशासन अॅक्टिव्ह झाले आहे. मागील तीन दिवसांत पुणे, कुरकुंभ, सांगली, दिल्लीतून 3 हजार 666 कोटींचे एमडी जप्त केले. परिणामी, सध्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची सर्वत्र चर्चा आहे. कुरकुंभमध्ये नसते उद्योग वाढत आहेत. मात्र, याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकार्यांना गांभीर्य राहिले नाही. सन 2017 पासून 2024 पर्यंत कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील तीन कंपन्यांत एमडी ड्रग्ज सापडले आहे. सन 2017 साली समर्थ लॅबोरेटरी व सुजलाम कंपनीत यापूर्वी ड्रग्ज साठा आढळून आला होता.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलिस ठाण्यात ड्रग्ज प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासाच्या द़ृष्टीने आरोपीला घेऊन बुधवारी (दि. 21) रात्री सोलापूर ग्रामीण पोलिस कुरकुंभला आले होते. सोलापूर पोलिसांनी दौंड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची मदत घेऊन समर्थ लॅबोरेटरी व सुजलाम कंपनीत चार तास चौकशी केली. मात्र, तेथे काहीही आढळून आले नाही.
हेही वाचा
राधानगरी येथे अपघात : एका भावाचा मृत्यू, दुसरा अत्यवस्थ
Weather Update : राज्यात पुण्याचा पारा नीचांकी; हुडहुडी वाढली
Farmer News : ऊस उत्पादकांना मिळणार 600 कोटी जादा
Latest Marathi News Pune Drugs Racket : मास्टरमाईंड काठमांडूमार्गे कुवेतला पळाला Brought to You By : Bharat Live News Media.