शासनाकडील ५१० कोटींच्या थकीत देयकांप्रकरणी कंत्राटदार संघटनेचे कामबंद आंदोलन
यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातील कंत्राटदारांची एकूण ५१० कोटींची देयके शासनाकडे थकीत आहेत. यापैकी केवळ ४२ कोटी रुपये आले आहेत. त्यामुळे उपजीविका करणेही कठीण झाले आहे. शासनाकडून तुकड्या तुकड्यात निधी दिला जातो. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींचे नाव सांगून अधिकारी टक्केवारी घेतात, असा घणाघाती आरोप जिल्हा कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उंबरकर यांनी पत्रकार परिषदेतून केला. शासनाच्या धोरणाविरोधात कंत्राटदार संघटनेने पुकारले आहे.
कंत्राटदार संघटनेची राज्यस्तरीय बैठक १६ फेब्रुवारी रोजी खुलताबाद संभाजीनगर येथे झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्य शासनाला अखेरचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. २८ फेब्रुवारी रोजी कंत्राटदारांचे शिष्टमंडळ मंत्री व सचिवांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देणार आहेत. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर १ मार्चपासून सर्वत्र कामबंद आंदोलन केले जाईल, असा ठराव घेण्यात आल्याचे प्रवीण उंबरकर यांनी सांगितले. यासोबतच शासनाकडे इतर पाच मागण्या करण्यात आल्या आहेत. कंत्राटदार संरक्षण कायद्याची मागणी आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शासनाकडे केल्याचे प्रवीण उंबरकर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला यवतमाळ जिल्हा, कंत्राटदार संघटनेचे राहुल काळे, पंकज वाधवाणी, जगजितसिंग ओबेरॉय यांच्यासह कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest Marathi News शासनाकडील ५१० कोटींच्या थकीत देयकांप्रकरणी कंत्राटदार संघटनेचे कामबंद आंदोलन Brought to You By : Bharat Live News Media.