भारतीय नौदलातील युद्धनौकांसाठी २०० ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीला मंजुरी
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : चीनी दादागिरीच्या मुकाबल्यासाठी नौदलाची शक्ती वाढविण्याच्या योजनेंतर्गत युद्धनौकांना ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रुज क्षेपणास्त्राने सुसज्ज केले जाणार आहे. त्यासाठी २०० हून अधिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदीला सरकारने मंजुरी दिली आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची काल (दि. २१) बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये २०० हून अधिक ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदीला हिरवा कंदिल दाखविण्यात आला. तब्बल १९ हजार कोटी रुपयांचा हा खरेदी व्यवहार आहे. यासाठी ब्रह्मोस एअरोस्पेस आणि संरक्षण मंत्रालयामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात करारावर सह्या होतील.
भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून तयार झालेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता अत्युच्च दर्जाची असून ते जमिनीवरून, पाणबुडीतून, युद्धनौकेतून अथवा लढाऊ विमानातून सोडता येऊ शकते. त्यामुळे युद्धनौकांसाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्याचा निर्णय भारतीय नौदलाची ताकद वाढविणारे आहे.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात स्वदेशीकरण करण्यात आले असून हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र फिलिपिन्सला देखील निर्यात केले जाणार आहे. यासोबतच दक्षिण चीन समुद्रात चीनी उपद्रवाला कंटाळलेल्या आशियायी प्रशांत महासागर क्षेत्रातील अनेक देशांनी ब्राह्मोस खरेदीसाठी उत्सुकता दाखविली आहे.
Latest Marathi News भारतीय नौदलातील युद्धनौकांसाठी २०० ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदीला मंजुरी Brought to You By : Bharat Live News Media.