गोंदियात निवडणुकीपूर्वी आढळला बेकायदेशीर शस्त्रसाठा; घरात लपवून ठेवलेल्या ११ तलवारी जप्त

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : गुप्त माहितीच्या आधारे एका घरावर छापा टाकून 11 छुप्या तलवारी जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश आले आहे. जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फत्तेपूर गावात 20 फेब्रुवारी रोजी दुपारी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पथकाला सूचना दिल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बादल दलित खोब्रागडे (वय 27) याला अटक केली असून त्याच्याकडून परवाना नसताना त्याच्या घराच्या स्वयंपाकघरात अवैधरित्या लपवून ठेवलेल्या सुमारे 11 हजार रुपये किमतीच्या 11 तलवारी जप्त केल्या. चौकशीत बादल खोब्रागडे याने या तलवारी आत्ये भाऊ गौतम उर्फ निगम उर्फ गामा संजय वहाणे रा. वाजपेयी वॉर्ड गोंदिया याच्या सांगण्यावरून ठेवल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी बादल दलित खोब्रागडे (वय 27 वर्षे, रा. फतेपूर ता. जि. गोंदिया), गौतम उर्फ निगम उर्फ गामा संजय वहाणे (रा. वाजपेयी वार्ड, गोंदिया) याच्याविरुद्ध कलम 4, 25, भारतीय शस्त्र कायदा, उपकलम 37(1), (3) मुंबई पोलीस अधिनियम 1951, कलम 135 अन्वये गंगाझरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, सहाय्यक फौजदार अर्जुन कावळे, पोहवा. राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, महेश मेहर, सोमेंद्र तुरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, पोशि अजय रहांगडाले, घनश्याम कुंभलवार यांनी केली.
Latest Marathi News गोंदियात निवडणुकीपूर्वी आढळला बेकायदेशीर शस्त्रसाठा; घरात लपवून ठेवलेल्या ११ तलवारी जप्त Brought to You By : Bharat Live News Media.
