हिरडा नुकसानभरपाई द्या; अन्यथा तीव्र आंदोलन : प्रभाकर बांगर यांचा इशारा
मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील आदिवासी बांधवांनी हिरडा नुकसानभरपाईच्या संदर्भात मंचर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. याबाबत राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊन आदिवासी बांधवांना तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी मंगळवारी (दि. 20) दिला. मंचर (ता. आंबेगाव) येथे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे आणि त्यांच्या सहकार्यांनी मंचर प्रांत कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला.
त्यासाठी मंचर शहरातून रॅली काढण्यात आली. या वेळी प्रभाकर बांगर म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे आदिवासी बांधवांचे हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सरकारकडून आदिवासी बांधवांना झुलवत ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत किसान सभेने अनेकदा पाठपुरावा केला. मंत्रालयात बैठका झाल्या. मात्र, आदिवासी बांधवांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.
या वेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम गावडे, वनाजी बांगर, देवळे गावचे सरपंच दीपक घुटे, सदस्य शिवाजी बोर्हाडे, पेसा अध्यक्ष राहुल घुटे, प्रकाश कोळेकर, संतोष पवार, पंकज पोखरकर, दीपक पोखरकर, सुभाष पोखरकर, हरिदास बांगर, बाळासाहेब बांगर, संजय साबळे यांच्यासह संघटनेचे व किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय किसान सभेचे लक्ष्मण जोशी आणि गणपत घोडे यांचीही या वेळी भाषणे झाली.
हेही वाचा
फडणवीस, मुनगंटीवरांना डी.लिट पदवी देण्याचा गोंडवाना विद्यापीठाचा निर्णय; विविध संघटनांचा विरोध
2800 कोटी रुपये जिंकले; पण, लॉटरी कंपनीने हात वर केलं
टेकपोळेतील आगीत जनावरांचा गोठा भस्मसात; शेतकरी गंभीर जखमी
Latest Marathi News हिरडा नुकसानभरपाई द्या; अन्यथा तीव्र आंदोलन : प्रभाकर बांगर यांचा इशारा Brought to You By : Bharat Live News Media.