हाजी मस्तान मिर्झा! कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन?
सुरेश पवार
मुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले. पण, एकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डला सर्वात आधी प्रकाश झोतात आणले; शिवाय अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूड यांच्या दरम्यान परस्पर संबंधांचा सेतू बांधला आणि ते नाव म्हणजे कुप्रसिद्ध माफिया, नामचीन स्मगलर हाजी मस्तान मिर्झा! रक्ताचा एकही थेंब न सांडता, फार मोठा खूनखराबा न करता मुंबईच्या अंडरवर्ल्डवर वर्चस्व गाजविणारा पहिला अंडरवर्ल्ड डॉन अशी हाजी मस्तानची ओळख आहे. 1950 ते 1980 अशी सलग तीस वर्षे मुंबईच्या गुन्हे विश्वावर हाजी मस्तानचे वर्चस्व होते.
मुंबईत आगमन! : हाजी मस्तान हा मूळचा तामिळनाडूचा, तामिळनाडूच्या कुड्डलोर येथे 26 मार्ज 1926 रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात हाजी मस्तानचा जन्म झाला होता. मुंबईत जाऊन भरपूर पैसा कमवावा, हे त्याचे स्वप्न होते. मस्तानचे वडील हैदर मिर्झा यांनी पोटा-पाण्यासाठी बायका-पोरांसह 1934 साली मुंबई गाठली आणि हाजी मस्तानचे पहिले पाऊल मुंबईत पडले. भविष्यात पुढे जाऊन हे बाळ मुंबईचा डॉन बनेल, असे त्यावेळी कुणाला स्वप्नातही वाटले नसेल.
गुन्हेगारी विश्वात पहिले पाऊल! : 1944 सालापासून कुटुंबाला हातभार लावण्याच्या हेतूने मस्तानने डॉक यार्डमध्ये कुली म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान गालिब शेख सोबत मस्तानची ओळख झाली. गालीब हा छोटी-मोठी तस्करी करायचा. त्याला एका हुशार मुलाची गरज होती. त्याने मस्तानला आपल्या बरोबरीने तस्करीत सामावून घेतले आणि हाजी मस्तानचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. चाळीसच्या दशकात इलेक्ट्रॉनिक सामान, महागडी घड्याळे, सोने, चांदी किंवा दागिने या वस्तूंच्या तस्करीला उधाण आले होते. या तस्करीतून मस्तानला दाम-दसपट कमाई होऊ लागली. आता मस्तानचे आयुष्य पहिल्यापेक्षा फार बदलले होते. एक साधारण हमालाचे काम करणारा मस्तान पाहता पाहता कुख्यात माफिया आणि मुंबईचा डॉन बनला होता.
गुन्हेगारी वर्तुळात दबदबा! : मस्तानच्या आधी मुंबईच्या गुन्हेगारी वर्तुळात वरदाराजन मुदलियार ऊर्फ वरदा याची दहशत होती. पण, त्याला मस्तानसारखी माफिया डॉनची प्रतिमा निर्माण करता आली नाही. काही काळानंतर वरदाराजन चेन्नईला निघून गेला. तो गेल्यानंतर मात्रच्या मुंबई अंडरवर्ल्डमध्ये फक्त मस्तानभाई म्हणजेच हाजी मस्तान हे नाव होते. 1970 चे दशक येईपर्यंत मस्तानने मुंबईवर आपली वेगळी जागा निर्माण केली होती. मुंबईच्या समुद्रावर फक्तमस्तानचेच शासन चालत होते.
बॉलीवूडचे होते वेड : मुंबईच्या या अंडरवर्ल्ड डॉनला बॉलीवूडचे खूपच आकर्षण होते. हाजी मस्तान बॉलीवूड अभिनेत्री मधुबालाचा प्रचंड चाहता असल्याचे मुंबईतील जुने लोक सांगतात. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते; पण परिस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर त्याने मधुबाला सारख्या दिसणार्या सोना या फिल्म अभिनेत्रीसोबत विवाह केला. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राज कपूर, धर्मेंद्र, फिरोज खान आणि संजीव कुमार सारखे दिग्गज बॉलीवूड अभिनेते हाजी मस्तानचे मित्र होते अशी बोलवा आहे. पोलिस आणि कायद्याला तो झुगारत नव्हता. पोलिसांनी त्याला 1974 मध्ये अटक केली असता, त्याच्यासाठी व्हीआयपी सुविधा दिली होती. त्याला तुरुंगात न टाकता एका बंगल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आले होते. पोलिस त्याला सलाम करीत असत, कारण मस्तान देखील पोलिसांना लागेल ती मदत करत होता.
तुरुंगात रवानगी! : मस्तानच्या वाढत्या कारवाया विचारात घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या आदेशावरून पोलिसांनी मस्तान मिर्झाला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. आणीबाणी लागू केल्यानंतर मात्र त्याला 1975 साली अटक करण्यात आली. तुरुंगात जाण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. 18 महिने तो तुरुंगात राहिला होता. येथून त्याच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळणार होती. तेथे त्याची आणि समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांची भेट झाली. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मस्तानवर त्याचा विशेष प्रभाव पडला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मस्तानचे हेतू बदलले होते. त्याने गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकण्याचा निश्चय केला.
राजकारणात पाऊल! : तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मस्तानने 1980 मध्ये गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकला आणि राजकारणाकडे आपला मोर्चा वळविला. 1984 मध्ये राज्यातील दलित नेते जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत मस्तानने दलित-मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षाची सुरुवात केली. पक्षाला राजकारणात यश मिळाले नसले तरी दरम्यानच्या काळात झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये मस्तानने काळ्या पैशाचा बेफाम वापर केला. निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर ही संकल्पना मस्ताननेच रुजविली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या जीवनातील शेवटचे दिवस त्याने आपली पत्नी आणि दत्तक घेतलेल्या मुलासोबत शांततेत घालविले. अशा या पहिल्या डॉनचा, हाजी मस्तानचा 1994 साली हृदयविकाराने मृत्यू झाला. मुंबईत आजही त्याच्या नावाचे किस्से ऐकायला मिळतात.
ना चलाई गोली, ना ली किसीकी जान! : हाजी मस्तान मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वांत मोठा ताकदवर डॉन होता. पण, या डॉनने आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणाचाही जीव घेतला नाही. त्याने कोणावरही हल्ला केला नाही. एवढेच नाही तर त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात कुणावर एक गोळीसुद्धा झाडली नाही. नाही म्हणायला मस्तानच्या सांगण्यावरून दोन गुन्हेगारांनी एकदा गुन्हेगार आणि एकेकाळचा त्याचा साथीदार युसूफ पटेलवर गोळीबार केला होता; पण युसूफ त्यातून वाचला होता. असे असूनही हाजी मस्तान मिर्झा हे मुंबईच्या आणि अवघ्या महाराष्ट्राच्या गुन्हेगारी विश्वातील एक बडे नाव होते.
चित्रपटकथांचा नायक!
बॉलीवूडवर हाजी मस्तानचा बराच प्रभाव दिसतो. त्याच्या आयुष्यावर बेतलेले अनेक किस्से वेगवेगळ्या हिंदी चित्रपटातून बघायला मिळतात. काही चित्रपट तर थेट त्याच्यावरच बेतलेले आहेत, जसे की अमिताब बच्चनचा ‘दिवार’, अजय देवगणचा ‘कंपनी’, विनोद खन्नाचा ‘दयावान’ इत्यादी इत्यादी! अनेक चित्रपटकथांना हाजी मस्तानचा जीवनपटच हातभार लावताना दिसतो. हाजी मस्तानला जाऊन आज जवळपास तीस वर्षे लोटली; मात्र आजही हिंदी चित्रपट सृष्टीवर डॉन हाजी मस्तानचे गारुड कायम असलेले दिसते. आजही काही हिंदी चित्रपटांतून अधून मधून हाजी मस्तानच्या जीवनातील काही सत्य घटना वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने डोकावताना दिसतात.
The post हाजी मस्तान मिर्झा! कसा बनला मायानगरीचा पहिला डॉन? appeared first on Bharat Live News Media.