चिमुकल्यांचा प्रवेश आता बालवाटिकांमध्ये!
गणेश खळदकर
पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने तीन ते आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नेमका अभ्यासक्रम कसा असावा, याचा एक आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये चिमुकल्यांचा प्रवेश आता ‘बालवाटिकां’ मध्ये करण्यात येणार असून त्यांना खेळ आधारित द़ृष्टिकोनाद्वारे संख्याज्ञान विकसित करून बालकांमध्ये बोधात्मक आणि भाषिक क्षमता विकसित करून बालकांना तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पूर्वप्राथमिक वर्गात वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर प्रत्येक बालक प्रवेश घेईल यालाच ‘बालवाटिका’ संबोधले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी ‘उन्मुख’ ही शिक्षक मार्गदर्शिका जाहीर केली आहे. त्यामध्ये बालशिक्षण केंद्रातील 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 या वयोगटाच्या वर्गांना बालवाटिका असे संबोधले आहे. विद्या प्राधिकरणा मार्फत जाहीर केलेल्या आराखड्या मध्ये भाषा, इंग्रजी, गणित, कलाशिक्षण, कार्यशिक्षण, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण आदी विषयांचा अभ्यासक्रम कसा असावा, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पायाभूत स्तरावर सर्वंकष द़ृष्टीने सक्षम बनविण्यासाठी अध्ययन अनुभव समृद्ध केलेले आहेत.
त्यामध्ये विविध उपक्रमांचा अंतर्भाव केलेला आहे. पायाभूत स्तर 3 ते 4, 4 ते 5 व 5 ते 6 साठी बालकेंद्रित, कृती आधारित आनंददायी व मनोरंजक पद्धतीने कथा, कविता, नाट्यछटा, गंमतगाणी, मुखवटे, यमकयुक्त गाणी, बाहुली खेळ तसेच परिसरीय आणि सांस्कृतिक ठेवा असलेली गाणी, कविता इत्यादींचा समावेश केला आहे. तसेच, 6 ते 7 व 7 ते 8 वर्षे वयोगटातील बालकांसाठी नाट्यीकरण, गोष्ट खेळासाठी साखळ्या तयार करून प्राणी, वस्तू इत्यादीशी संबंधित संभाषण, वर्णन, चित्रवाचन, अनुभवकथन व पात्रयुक्त कथन इत्यादी. तसेच, विशिष्ट प्रकारची गाणी, प्रेरणा मित्र, कोडी, चित्र, भाषिक खेळ स्वनिर्मित यमकयुक्त कविता तयार करणे, स्व- अभिव्यक्ती इत्यादींचासुद्धा समावेश केला आहे, असे स्पष्ट केले आहे.
गणित शिक्षणाची महत्त्वाची विशिष्ट ध्येये
मूलभूत संख्याज्ञान : संख्या व राशी दैनंदिन आंतरक्रिया करण्यासाठी व सभोवतालचे जग समजून घेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. गणित शिक्षणातून सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत संख्याज्ञान अवगत करण्याची हमी दिली गेली पाहिजे.
गणितीय विचारप्रक्रिया : यामध्ये सुयोग्य व तार्किक पद्धतीने विचार करणे व जगाचा अन्वयार्थ लावणे यांचा समावेश होतो.
समस्या निराकरण : गणितीय विचाराच्या साहाय्याने समस्या निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हे गणित शिक्षणाचे एक महत्त्वाचे अंग आहे.
गणितीय अंतर्ज्ञान/अंत:प्रेरणा : गणितामध्ये काय सत्य असले पाहिजे किंवा नसले पाहिजे याचे अंतर्ज्ञान विकसित करणे हे पेपर, पेन्सिलच्या साहाय्याने गणित सोडवण्यापेक्षा महत्त्वाचे.
आनंद, जिज्ञासा व आश्चर्य : गणित शिक्षणातून आनंद, जिज्ञासा, सौंदर्यशास्त्र, सर्जनशीलता व आश्चर्य यांची द़ृष्टी (अर्थ) रुजवली पाहिजे.
गणित शिक्षणाच्या संदर्भात पुढील आव्हाने
सुरुवातीच्या काही इयत्तांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाशी संबंधित क्षमतेचा अभाव दिसून येतो.
गणित शिक्षण हे जास्त यांत्रिक व प्रक्रियात्मक आहे. ते अधिक सर्जनशील करण्यासाठी प्रयत्नांचा अभाव असणे.
पाठ्यपुस्तकामधील गणितीय संकल्पना विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित नसणे.
गणितीय मूल्यांकनाच्या पद्धती या घोकंपट्टी व अर्थहीन सरावावर भर देतात.
विद्यार्थ्यांमध्ये असणे गणिताची भीती व अपयशाची भावना.
वर्गामध्ये विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे याची पुरेशी दखल न घेणे. अध्ययन- अध्यापनात रंजकतेचा अभाव.
हेही वाचा
Anil Sable Drug Case : दुचाकी ते मर्सिडीज : साबळेचा प्रवास
पश्चिम बंगालमधील दीदीगिरी
लिंग गुणोत्तरात 669 ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये
Latest Marathi News चिमुकल्यांचा प्रवेश आता बालवाटिकांमध्ये! Brought to You By : Bharat Live News Media.