नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूरचे प्रसिद्ध शेफ ‘विक्रमवीर’ विष्णू मनोहर यांनी सोमवारी अयोध्येतील ऐतिहासिक हनुमानगढी परिसरात 7000 किलो रव्याचा ‘श्री राम भोग हलवा’ तयार केला. यानिमित्ताने नवा विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर प्रसाद म्हणून वितरण करण्यात आले.
‘कारसेवा ते पक्षसेवा’ या कार्यक्रमांतर्गत श्री हनुमत संस्कृत पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात 7000 किलोचा हा श्री राम भोग हलवा तयार करण्यासाठी श्री हनुमत संस्कृत पदव्युत्तर महाविद्यालय, हनुमानगढ निर्वाणी आखाडाने त्यांना आमंत्रित केले. या कार्यक्रमाला हनुमान गढी अयोध्या धामचे श्री 108 महंत प्रेमदास महाराज पिठासीन, श्री अयोध्या नरेल बिमलेंद मोहन प्रताप मिश्र, खासदार लल्लू सिंह जी, आमदार वेदप्रकाश गुप्ता, महापौर महंत गिरीशपती त्रिपाठी, वडोदरा गुजरातचे मिलिंद वैद्य यांची उपस्थिती होती. याशिवाय नागपूर,धुळे आणि अमेरिकेतून विष्णू यांचे चाहते आले होते.
भगवान विष्णूंना रव्यापासून बनवलेले गोड पदार्थ आवडतात तर प्रभू श्रीरामचंद्र हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे सत्यनारायण पूजेमध्ये रव्याच्या शि-याला अधिक महत्त्व दिले जाते. सत्यनारायण पूजेसाठी तयार केल्या जाणा-या प्रसादासारखाच हा हलवा केळीचे तुकडे टाकून तयार केला गेला. उत्तर प्रदेशातील लोकांसाठी हा एक नवीन प्रयोग असेल. हलवा बनवण्याआधी अन्नपूर्णा मातेची पूजा केली गेली. 11 वेळा रामरक्षा पाठ झाला. विष्णू मनोहर रामनाम असलेले वस्त्र परिधान करून महंतांच्या मंत्रांच्या उच्चारात श्री राम भोग हलवा तयार करायला सुरुवात केली.
हा हलवा बनविण्यासाठी 10 फूट बाय 10 फूट आकाराची कढई वापरली गेली. 1000 किलो रवा, 1000 किलो तूप, 1400 किलो साखर, 4500 लिटर पाणी (मिनरल वॉटर), 21 किलो वेलची पावडर, 21 किलो जायफळ पावडर, 250 डझन केळी वापरण्यात आले. याशिवाय काजू, बेदाणे, बदाम आदी सुमारे 200 किलो सुका मेवा वापरण्यात आला आहे. हा हलवा बनवायला 4 तास लागले.
Latest Marathi News १ टन रवा, १ टन तूप, २५० डझन केळी, २ क्विंटल सुका मेवा; अयोध्येत बनवला ७ हजार किलोचा ‘श्री राम भोग हलवा’ Brought to You By : Bharat Live News Media.