रायगड: पाचाड येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी मंजूर
श्रीकृष्ण द बाळ
महाड: किल्ले रायगडावर येणारे शिवभक्त व पर्यटक यांना छ. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीचा इतिहास समजावा, यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ७५ एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटींच्या निधीला पर्यटन व सांस्कृतिक विभागाने मान्यता दिली. या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती शिवसेना प्रतोद, महाड पोलादपूर, माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली.
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी देश विदेशातून लाखो शिवभक्त आणि पर्यटक येत असतात. ३५० वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर असणारे वैभव हे गडावर असलेल्या वास्तुंचे जतन व संवर्धन करण्याचे काम रायगड प्राधिकरणामार्फत सुरु आहे. मात्र, हिंदवी स्वराज्याची उभारणी करण्यासाठी छ. शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी लढलेल्या लढाया, जिंकलेले गडकिल्ले, शिवरायांचा राज्याभिषेक आदी सर्व इतिहास भावी पिढीला आणि किल्ले रायगडावर येणारे शिवभक्त, पर्यटकांना समजावा, यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे शिवसृष्टी उभारावी, यासाठी पाठपुरावा सुरू होता, असेही गोगावले यांनी सांगितले.
१९ फेब्रुवारीरोजी शिवजयंतीचा मुहूर्त साधत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकछत्र योजनेअंतर्गत पाचाड येथे शिवसृष्टी उभारली जाणार आहे. त्यामुळे ३५० वर्षापूर्वीचा शिवकालीन इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे.
हेही वाचा
Eknath Shinde : रायगडच्या धर्तीवर शिवनेरीचा विकास : मुख्यमंत्री शिंदे
किल्ले रायगडच्या हिरकणी बुरुज परिसरात २ युवक अडकले; शिलेदार रेस्क्यू टीमने काढले बाहेर!
किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात
Latest Marathi News रायगड: पाचाड येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी मंजूर Brought to You By : Bharat Live News Media.