बस थांब्यावर नेमणार सेवक : विद्यार्थ्यांना करणार मदत
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना पीएमपी बसमधून जाताना दरवाजाला लटकत, कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत होता. यासंदर्भात दै.‘Bharat Live News Media’मध्ये सोमवारी (दि.19) वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याची दखल घेत प्रशासनाने विद्यार्थ्यांना आगामी परीक्षा कालावधीत बसच्या पुढच्या दाराने प्रवेश करण्यास मुभा दिली आहे. तसेच, जागा मिळवून देण्यासाठी शहरातील मुख्य स्थानकांवर पर्यवेक्षकीय सेवकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त गाड्यादेखील सोडल्या जाणार आहेत.
आगामी काही दिवसांत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठीच्या बस प्रवासामध्ये वाढ होणार आहे. त्यांना वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचावे लागणार आहे. त्यातच अगोदरच विद्यार्थ्यांना बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने विद्यार्थ्यांना या खास सुविधा पुरविण्याचे नियोजन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीमध्ये या खास सुविधांमध्ये वाढ होणार आहे. परीक्षा कालावधीमध्ये बसपासधारक विद्यार्थ्यांचे बसपास त्यांचे निवासस्थान आणि परीक्षा केंद्र यादरम्यान वैध मानण्यात येतील. विद्यार्थ्यांना वेगळे प्रवासी तिकीट घ्यावे लागणार नाही.
परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजातून प्रवेशाची मुभा राहील. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्राधान्याने बससेवा उपलब्ध व्हावी, याकरिता गर्दीच्या बसथांब्यांवर अधिकारी/पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच, शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास अतिरिक्त बसेसचेदेखील नियोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडून पासची व्यवस्था केली जाते. यासोबतच शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत आमच्याकडून बसच्या फेर्यादेखील वाढविल्या जातात. आगामी परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त गाड्या सोडल्या जातील. तसेच, बस थांब्यांवर विद्यार्थ्यांना जागा मिळवून देण्यासाठी पर्यवेक्षकीय सेवकांची नेमणूक केली जाईल. त्यासोबतच विद्यार्थ्यांना पुढच्या दाराने चढण्यास मुभा देण्यात आली आहे.
डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
हेही वाचा
NMC News | मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी मनपा देणार शिष्यवृत्ती
ऊसतोड कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना 5 लाख
तडका : व्हॉटस्अॅपचा किमयागार
Latest Marathi News बस थांब्यावर नेमणार सेवक : विद्यार्थ्यांना करणार मदत Brought to You By : Bharat Live News Media.