नगर : आ. लंके-शिंदे दोस्ताना; विखेंची वाट बिकट!
संदीप रोडे
नगर : लोकसभा निवडणुकीसाठी 2019 मध्ये सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला जागा सोडण्यास शरद पवारांनी ठामपणे नकार दिला होता. त्यामुळेच डॉ. सुजय विखे-पाटील काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपात गेले अन् खासदार होत दिल्ली दरबारी पोहोचले. आता डॉ. सुजय यांना दुसर्यांदा भाजपची उमेदवारी मिळेल का, याची धाकधूक त्यांच्या समर्थकांना असल्याचे दिसते. त्यातच विखे यांची धावपळ चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीतही त्यांचे भवितव्य पवारांच्याच हाती असल्याचे दिसते आहे. फरक इतकाच, की 2019 ला शरद पवार होते, आता अजित पवार आहेत!
1952 पासून 1998 पर्यंत नगर दक्षिण लोकसभेवर काँग्रेसची कमांड होती. नगरने सतत काँग्रेसचा खासदार निवडून दिला. 1998 च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांनी पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकावला. तेव्हापासून तुकाराम गडाख (2004-09) यांचा अपवाद सोडला, तर नगरमध्ये भाजपचा खासदार निवडून येत आहे. दिलीप गांधींच्या हॅट्ट्रिकनंतर सुजय विखे-पाटील हे भाजपचे खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘गॅरंटी’ने भाजपचा उमेदवार सहज बाजी मारेल, असा दावा केला जात असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना वजा करून भाजपला चालणार नाही.
लोकसभा मतदारसंघात येणार्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पारनेर व नगरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असून, श्रीगोंद्यातही त्यांचा प्रभाव आहे. शेवगाव-पाथर्डीत भाजपच्या मोनिका राजळे, कर्जत-जामखेडला राष्ट्रवादीचे (शरद पवार) रोहित पवार आमदार आहेत. मात्र कर्जत-जामखेडमधील भाजपचे राम शिंदेही आमदार आहेत. राहुरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आमदार असले तरी तेथे भाजपचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचाही दबदबा आहे. एकूणच भाजपला ही निवडणूक एकतर्फी वाटत असली तरी अजित पवारांना दुर्लक्षित करून चालणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके हे विखेंविरुद्ध लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचे त्यामागील कारण. स्थानिक राजकारणात लंके-विखे यांचे विळ्या-भोपळ्याने नाते, तर आ. शिंदे-विखेंची पक्षांतर्गत ‘रेस’ नगरसह राज्यालाही ठाऊक आहे.
भाजपचे आमदार राम शिंदे आणि लंके यांचा ‘दोस्ताना’ पाहता विखे यांची दुसर्या टर्मच्या उमेदवारीची वाट बिकट होताना दिसते; मात्र लंके उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दापुढे नाहीत, हे नक्की. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप हेही अजित पवारांचे खासम्खास (विखेंशी मैत्री असली तरी दादांचा शब्द प्रमाण!). श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आमदार असले तरी ते ‘रेंज’मध्ये नसल्याच्या तक्रारी, त्यातच स्थानिक प्रभावी नेतृत्व राजेंद्र नागवडेंचा राष्ट्रवादी प्रवेश अन् बारामतीलगत असलेल्या श्रीगोंद्यावर अजित पवारांची कमांड असल्याने नाकारून चालणार नाही. एकूणच सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांत असलेले अजित पवारांचे प्राबल्य अन् आ. लंकेंची संभाव्य उमेदवारी पाहता सुजय विखेंचे भवितव्य पवारांच्या हाती, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये!
…म्हणून विखे-पाटील सावध अन् मंत्री शहांची भेट
विद्यमान खासदार अन् जिल्ह्याच्या राजकारणात चौफेर वावर, ‘साखरपेरणी’ पाहता सुजय विखेंसाठी अवघड काहीच नाही; पण तरीही ते ‘विश्रामावस्था’ सोडून ‘सावधान’ अवस्थेत आल्याचे दिसते. कांदा प्रश्नावरून झालेल्या कोंडीच्या निमित्ताने विखे पिता-पुत्र गुरुवारी थेट दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहांच्या भेटीला पोहोचले. राज्यातील राजकीय स्थितीवर म्हणण्यापेक्षा नगरच्या उमेदवारीबाबतच त्यांच्यात खलबते झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच सारे आले!
Latest Marathi News नगर : आ. लंके-शिंदे दोस्ताना; विखेंची वाट बिकट! Brought to You By : Bharat Live News Media.