बाळासाहेबांचे वारस म्हणून सांगायला मनगटात जोर हवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : त्यांच्याकडे असेपर्यंत शिवसैनिक चांगला असतो. त्यांना सोडून गेला तर तो गद्दार आणि कचरा ठरतो. शिवसैनिकांना कचरा म्हणणार्‍या त्यांनाच आता राज्यातील शिवसैनिक कचर्‍यात टाकल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणार्‍यांनी आधी स्वतः आरसा पाहावा. वारसदार म्हणून सांगण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन दिवसीय … The post बाळासाहेबांचे वारस म्हणून सांगायला मनगटात जोर हवा appeared first on पुढारी.

बाळासाहेबांचे वारस म्हणून सांगायला मनगटात जोर हवा

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : त्यांच्याकडे असेपर्यंत शिवसैनिक चांगला असतो. त्यांना सोडून गेला तर तो गद्दार आणि कचरा ठरतो. शिवसैनिकांना कचरा म्हणणार्‍या त्यांनाच आता राज्यातील शिवसैनिक कचर्‍यात टाकल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणार्‍यांनी आधी स्वतः आरसा पाहावा. वारसदार म्हणून सांगण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शंभूराज देसाई, गजानन कीर्तीकर, संयोजक व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर हे अधिवेशन संपन्न झाले.
शिवसेनाप्रमुखांमुळेच मुख्यमंत्री
कोल्हापूर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतुट नाते असल्याचे उल्लेख करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात अंबाबाईचे दर्शन घेऊन केली जात होती. त्याचमुळे आम्ही अधिवेशन कोल्हापुरात घेण्याचा निर्णय घेतला. शिवसैनिकांचा उत्साह पाहून कोल्हापुरात भगवे वादळ अवतरले. या गर्दीमुळे शिवसेना कुणाची, हे सांगण्याची गरज नाही. फक्त शिवसेनाप्रमुखांमुळेच मी मुख्यमंत्री झालो.
…तर एवढे प्रेम मिळाले नसते
मी जातो तेथे हजारो लोक स्वागतासाठी दुतर्फा असतात. आम्ही चुकीचे पाऊल उचलले असते तर कोण आले नसते. प्रेम, आपुलकी पैसे देऊन विकत घेता येत नाही. ती कामातून, वागण्यातून आणि बोलण्यातून मिळते. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी काँग्रेसला लांब ठेवा, असे सांगितले. परंतु त्यांनी काँग्रेसला डोक्यावर घेतले. शिवसेनाप्रमुखांचे विचार मरू लागले. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले. वीर सावरकर यांचा अपमान झाला, तेव्हा त्यांचे हिंदुत्व कुठे गेले होते? माणूस सत्तेकडे जातो. पण, आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण वाचविण्यासाठी छातीवर दगड ठेवून बंड करण्याचे धाडस केले. शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जात आहोत.
त्यांना खोके नाही, कंटेनर लागतात
शिवसेनेत बंड केल्यानंतर 50 खोक्यांचा आरोप केला जात होता. मात्र, आम्ही अनुभव घेतला आहे. त्यांना कंटेनर लागतात. तसेच शिवसेना आमची झाल्यानंतर एक पत्र आले. त्यात सेनेच्या खात्यातील 50 कोटी द्यावेत, अशी मागणी केली. क्षणाचाही विलंब न करता रक्कम देऊन टाकली. कारण आम्हाला पैसे नाहीत तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हवेत. त्यावरूनच शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे खरे वारसदार कोण हे स्पष्ट होते. त्यामुळे आमचा बाप चोरला म्हणणार्‍यांनो, जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
‘मातोश्री’ आता उदास हवेली…
शिवसेनाप्रमुख होते तोपर्यंत ‘मातोश्री’वरून वाघाची डरकाळी ऐकू यायची. मातोश्री मंदिर होते. परंतु, दरबारी राजकारण आणि कानात सांगणार्‍या भुंग्यांमुळे उद्धव ठाकरे यांना असुरक्षित वाटू लागले. त्यातून घाणेरडे राजकारण सुरू झाले. त्यामुळे आता ‘मातोश्री’वरून रडण्याचा आवाज येतो. मातोश्री उदास हवेली झाली, असा घणाघातही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून घरादारावर तुळशीपत्रे ठेवून शिवसेना मोठी केली. तुम्ही आयत्या पीठावर रेघोट्या मारायला आला. त्याही नीट मारता आल्या नाहीत. चांगला कार्यकर्ता असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तरच पक्ष मोठा होतो. दोन-चार टकल्यांनी पक्ष मोठा होत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
इनोसंट चेहर्‍यामागे अनेक चेहरे…
2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले होते. मग भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याऐवजी काँग्रेसबरोबर केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी गळ घातल्याचे त्यांनी सांगितले. पण, मी त्यांना मी पदाला हपापलो नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यांच्या या इनोसंट चेहर्‍यामागे अनेक चेहरे आहेत. त्यामुळे लग्न एकाबरोबर, संसार दुसर्‍याबरोबर आणि हनीमून तिसर्‍याबरोबर असा खेळ त्यांंनी केला. पहिला आरसा पाहावा. त्यानंतर तुम्ही किती मुखवटे घालून फिरत आहात ते दिसेल, असा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
मला ठार मारण्याचा कट…
नक्षली भागात मी विकासकामे करण्याचा ध्यास घेतला. त्यातून माझ्यावर नक्षली हल्ला होण्याची माहिती पोलिसांना मिळाली. शासनाने मला झेड प्लस सुरक्षा पोहोचविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. परंतु, ती सुरक्षा देऊ नये, यासाठी त्यांनी मंत्र्यांना फोन केल्याचा आरोपही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. मला मारण्याचाच हा कट होता. मी डरपोक नाही. निधड्या छातीचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
मला खंतही आणि अभिमानही…
खा. श्रीकांत शिंदे यांनी कालच्या भाषणात मी बाप म्हणून, नवरा म्हणून आणि मुलगा म्हणून कुणालाही वेळ देऊ शकलो नसल्याने खंत व्यक्त केली. तसेच शेतकर्‍याचा मुलगा, रिक्षाचालक ते मुख्यमंत्री या प्रवासाबद्दल अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाने माझे डोळे उघडले, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. मी अपयशी ठरल्याने मलाही खंत वाटते. परंतु, बाप म्हणून त्यांना माझा अभिमान वाटत असल्याने मलाही अभिमान आहे, असेही सांगितले. महाराष्ट्र माझा परिवार आहे आणि गर्दी हेच माझे टॉनिक. माझ्यासाठी सी. एम. म्हणजे चीफ मिनिस्टर नसून कॉमन मॅन आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
अन् त्यांना घाम आला होता…
त्यांनी शिवसैनिक, भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फसविल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सत्तेच्या खुर्चीसाठी त्यांनी सगळे घालविले. अजित पवार, अशोक चव्हाण आणि ते पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. भाजपला पाठिंब्याची ग्वाही दिली होती. बेईमानी, विश्वासघात केला. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर त्यांना घाम आला होता. ते दोन ग्लास पाणी पिल्याचे पवार व चव्हाण यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Latest Marathi News बाळासाहेबांचे वारस म्हणून सांगायला मनगटात जोर हवा Brought to You By : Bharat Live News Media.