मंगळावर ‘असे’ लागले सूर्यग्रहण

वॉशिंग्टन : 2024 मध्ये ग्रहणासारख्या अनेक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहेत. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण पाहण्याची संधी यामुळे सर्वसामान्य लोकांपासून ते संशोधकांपर्यंत अनेकांना मिळू शकते. सूर्यग्रहण त्यावेळी घडते ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यांच्यादरम्यान सरळ रेषेत चंद्र येतो व तो सूर्याचा प्रकाश अडवतो. एप्रिलमध्ये अमेरिकेत सूर्यग्रहण दिसेल. मात्र, केवळ पृथ्वीवरच सूर्यग्रहण दिसते, असे नाही. सौरमंडळाच्या अन्य ग्रहांवरही सूर्यग्रहण होत असते. अमेरिकेतील सूर्यग्रहणाआधी मंगळावर सूर्यग्रहण झाले आहे. त्याची नोंद मंगळावरील ‘पर्सिव्हरन्स’ या ‘नासा’च्या रोव्हरने घेतली आहे.
गेल्या आठवड्यात पर्सिव्हरन्सने याबाबतची छायाचित्रे टिपली आहेत. त्यांच्या टाईमलॅप्समध्ये मंगळाच्या फोबोस या छोट्या चंद्राला सूर्यासमोरून जात असताना पाहिले गेले. मंगळ ग्रहाच्या जेझेरो क्रेटरमध्ये हे रोव्हर 2021 मध्ये उतरले होते. त्याने 8 फेब्रुवारीला मंगळ आणि सूर्य यांच्यादरम्यान फोबोस नावाचा हा छोटा चंद्र जात असताना पाहिले.
‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या इंजिनिअरनी त्यानंतर सूर्यग्रहणाची 68 छायाचित्रे ऑनलाईन अपलोड केली. अर्थातच, हे खग्रास नव्हे, तर खंडग्रास किंवा अंशत: लागलेले ग्रहण होते. त्याच्यामुळे मंगळावर सूर्यप्रकाश पूर्णपणे अडून राहिला नाही की, मंगळावर अंधार पडला नाही. रोव्हरच्या मास्टकॅन-जेड कॅमेर्याने हे द़ृश्य टिपून घेतले. 8 एप्रिलला अमेरिकेतून खग्रास सूर्यग्रहण दिसून येईल.
Latest Marathi News मंगळावर ‘असे’ लागले सूर्यग्रहण Brought to You By : Bharat Live News Media.
