सांगली : कुपवाडमधील तरुणाचा कवलापुरात खून

कुपवाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला कवलापूर विमानतळ येथे नेऊन तिघांनी त्याचा खून केला. लतीफ मुबारक सदलगे (वय 30, रा. नानाजी पार्क, पाण्याचा खजिना, मंगळवार पेठ, कोल्हापूर, सध्या रा. मिरज रोड दर्ग्याजवळ, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. संशयितांनी प्रथमदर्शनी लतीफ हा अपघातात जखमी झाल्याचा बनाव केला. परंतु, कुपवाड पोलिसांनी, हा अपघात नसून खून असल्याचे काही तासात उघड केले आणि संशयितांना गजाआड केले.
मुख्य संशयित सचिन संजय ढेकळे (28, रा. शिवनेरीनगर, कुपवाड), किरणकुमार श्रीमहात राय (23, मूळ रा. बिहार, सध्या रा. मिरज रोड दर्ग्याजवळ, कुपवाड), स्वप्निल ऊर्फ गोट्या संजय आवळे (25, रा. इंदिरानगर, बुधगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लतीफ काही महिन्यांपासून मिरज रोड दर्ग्याजवळ एका फॅब्रिकेशन कारखान्यात काम करीत होता. तेथेच तो राहत असे. त्याची पत्नी व दोन लहान मुले कोल्हापुरात राहतात. लतीफ, सचिन आणि किरणकुमार एकाच कारखान्यात काम करीत होते. काही दिवसांपूर्वी लतीफने किरणकुमारसमोर सचिनच्या आईच्या विरोधात बोलताना अर्वाच्च भाषा वापरली होती. त्याने ही माहिती सचिनला दिली. त्याने मंगळवारी रात्री किरणकुमारला सोबत घेतले. ते लतीफकडे गेले. दोघे त्याला दुचाकीवरून कवलापूर विमानतळ येथे घेऊन गेले. तेथे बारमध्ये तिघे दारू पिले. त्यावेळी सचिनचा मित्र स्वप्निलही तेथे आला. दारू पिल्यानंतर चौघे विमानतळाच्या मोकळ्या जागेत आले. ‘तू सचिनच्या आईला अर्वाच्च भाषेत का बोललास, तुला मस्ती आली आहे’, असे म्हणून स्वप्निल व किरणकुमार यांंनी लतीफला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सचिनने त्याच्या डोक्यात दगड घातला. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्याला दुचाकीवर बसवून तिघांनी मिरज रस्त्यावरील कारखान्याजवळ आणून टाकले.
सचिनने कारखान्याच्या मालकाला मोबाईलवरून सांगितले की, तुझा कामगार लतीफ दारू पिऊन सावळी रस्त्यावर दुचाकीवरून पडल्याने जखमी झाला. त्याला कारखान्याजवळ सोडले आहे. मालक व दुसरा कामगार सुफीयाना शेख यांनी त्याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. सावळी रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन मृत झाल्याची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी अपघाताची माहिती घेतली असता, सावळी रस्त्यावर अपघातच झाला नसल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी फिर्यादी सुफीयाना याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सचिनने आम्हाला माहिती दिल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा अपघात नसून खून असल्याचे उघड झाले. लतीफला आम्ही तिघांनी मारहाण केली होती, त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची कबुली संशयितांनी दिली. दरम्यान, खून कवलापूर हद्दीत झाल्याने कुपवाड पोलिसांनी हा गुन्हा सांगली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला. लतीफचा मृत्यू डोक्याला गंभीर मार लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
Latest Marathi News सांगली : कुपवाडमधील तरुणाचा कवलापुरात खून Brought to You By : Bharat Live News Media.
