गुजरीतील सराफी पेढ्यांना 53 लाखांचा गंडा

कोल्हापूर : गुजरीतील पाच बड्या सराफी पेढ्यांना 53 लाखांना गंडा घालून प. बंगालमधील कारागीरासह साथीदारांनी 844 ग्रॅम सोन्यांसह गुरुवारी मध्यरात्री गाशा गुंडाळून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकारामुळे शहर व जिल्ह्यातील सराफी व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.
संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर नाकेबंदी केली. पोलिसांचे विशेष पथकही कोलकाताकडे रवाना झाले आहे.
गुजरीतील राघवेंद्र ज्वेलर्स, भुरके ज्वेलर्स, गांधी ज्वेलर्स, कारेकर ज्वेलर्स आणि चिपडे सराफ या पाच बड्या सराफी पेढ्यांना मोठा फटका बसला आहे. संशयित काशीनाथ पत्रा (35), सोमण पत्रा (32), शुभंकर माईन (35) विट्टू (30, सध्या रा. गरगटे कॉम्प्लेक्स, कासार गल्ली, गुजरी, कोल्हापूर, मूळ गाव उदयपूर, हुगळी, कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत.
शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुजरीसह न्यू महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानकासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.
मुख्य संशयित काशीनाथ पत्रा पत्नी व दोन मुलांसह कासार गल्लीत स्वमालकीच्या फ्लॅटमध्ये वास्तव्याला आहे. तो 15 वर्षांपासून जिल्ह्यातील बड्या सराफी पेढ्यांना डिझायनर दागिने तयार देत आहे. त्यामुळे त्याच्याकडे व्यावसायिकांची नेहमी गर्दी असे.
संशयित काशीनाथने पश्चिम बंगालमधील काही कारागीरांना दीड वर्षापूर्वी मदतीला बोलावून घेतले. त्यात त्याचा मेहुणाही होता. गुरुवारी मध्यरात्री दीड ते साडेतीनच्या सुमारास काशीनाथने पत्नी, दोन मुले व साथीदारासह किरकोळ साहित्य खोलीत ठेवून धूम ठोकली. या घटनेची माहिती परिसरात वार्यासारखी पसरली. सराफी व्यावसायिकांनी संशयिताच्या फ्लॅटजवळ गर्दी केली. याप्रकरणी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांच्या शोधासाठी पश्चिम बंगालमधील उदयपूर पोलिस ठाण्यांशी संपर्क साधण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक झाडे यांनी सांगितले.
संशयित सीसीटीव्ही फुटजमध्ये कैद
संशयित काशीनाथ पत्रासह त्याचे साथीदार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यासह कर्नाटकातही त्यांचा शोध घेण्यात येत आहेे.
Latest Marathi News गुजरीतील सराफी पेढ्यांना 53 लाखांचा गंडा Brought to You By : Bharat Live News Media.
