नेमकं माझं काय चुकलं ; घोलपांनी ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात काय?

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अखेर आज ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला. घोलप यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंकडे पाठवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा जोरदार धक्का मानला जात आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात गैरहजर असलेल्या घोलप यांनी दोनच दिवसांपूर्वी चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. घोलप यांच्या राजीनाम्यानंतर या चर्चेला बळकटी मिळाली आहे. (Baban Gholap)
असा आहे राजीनामा…
मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने व इमानेईतबारीत काम केले आहे. मला पक्षाने (संघटनेने) जे जे सांगितले, ते काम प्रामाणिकपणे केले आहे. पण, अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरून मला काढून अपमानित करण्यात आले व मी ज्या निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना काढून टाकले होते व नवीन पदाधिकारी नेमले होते. त्यांनाही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठेच ठेवले नाही. विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संपर्कप्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊनसुध्दा त्यांना परत घेऊन पदे दिली, हे सर्व पाहून मी अचंबित आहे. नेमकं माझं काय चुकलं ते समजलं नाही. मी याबाबत दादही मागितली. पण, काहीच उत्तर मिळाले नाही. माझे वकिली करणारेही गप्प आहेत. त्यापेक्षा आपण थांबून घेणे महत्त्वाचे वाटते, म्हणून मी माझ्या शिवसैनिकपदाचा राजीनामा देत असल्याचे घोलप यांनी उद्धव ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. (Baban Gholap)
शिंदे गटात प्रवेशाची शक्यता
चर्मकार समाज संघटनेच्या विविध मागण्यांसाठी घोलप यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात दोन दिवसांपूर्वी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतरच घोलप हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. आता ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतर ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. (Baban Gholap)
हेही वाचा :
Yodha Poster : १३ हजार फुटांवर फडकावलं Yodha Poster, सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ने केलं रेकॉर्ड
जलयुक्त’ रुतले प्रशासकीय गाळात !
NCP MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच : विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा निर्वाळा
Latest Marathi News नेमकं माझं काय चुकलं ; घोलपांनी ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात काय? Brought to You By : Bharat Live News Media.
