Pune : वाहनांच्या बॅटर्या चोरणारे दोघे जेरबंद

जेजुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : टीपरतील दोन बॅटर्या चोरून नेत असताना दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. जेजुरी एमआयडीसी चौकात ही कारवाई करण्यात आली. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा, चोरी, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अक्षय दिलीप शेवाळे (वय 23) व तेजाब जमीर खान (35, दोघे रा. निरा, ता. पुरंदर) अशी जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुमित पोपट जगताप (रा. जुनी जेजुरी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या जेजुरीतील श्रीबल्लाळेश्वर मंदिराशेजारी फिर्यादी सुमित जगताप यांची वीटभट्टी आहे.
त्यांच्याकडे वाहतूक करण्यासाठी टीपर हे वाहन आहे. दि. 22 जानेवारी रोजी वीटभट्टीशेजारी चालकाने टीपर वाहन लावले होते. दि. 23 जानेवारी रोजी सकाळी टीपर चालू झाला नाही. चालकाने पाहणी केली असता त्याच्या दोन्ही बॅटर्या चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानुसार जगताप यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, जेजुरी पोलिस पथक गस्त घालत होते. तेव्हा त्यांना एमआयडीसी चौकातून दोनजण दुचाकीवरून कापडाने झाकलेल्या वस्तू घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन बॅटर्या आढळून आल्या. चौकशीत दोघांनी त्यांनी नावे शेवाळे व खान अशी सांगून गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बॅटर्या व दुचाकी जप्त केल्या. सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे, सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, संदीप मोकाशी, पोलिस हवालदार विठ्ठल कदम, संतोष मदने, दीपक काशीद, प्रवीण शेंडे, हरीश्चंद्र करे, पोलिस मित्र नाना घोगरे आदींनी ही कारवाई केली.
Latest Marathi News Pune : वाहनांच्या बॅटर्या चोरणारे दोघे जेरबंद Brought to You By : Bharat Live News Media.
