
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज खासदार म्हणून कार्यकाळ सुरू असताना दाखल केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या. राजकीय जीवनात काहीना काही घडामोडी कराव्या लागतात. येणारा काळ आम्ही आज अर्ज का दाखल केला आहे हे स्पष्ट करेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विधानभवनातील निवडणूक कार्यालयात आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘आमची महायुती एकदम घट्ट असून चांगले काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येणार आणि ४०० चा टप्पा गाठणार,’ असा दावा यावेळी पटेल यांनी माध्यमांशी बोलताना केला.
महाराष्ट्रात अनेक चुकीचे व दिशाभूल करणारे सर्व्हे येत आहेत. तरीही आम्ही महाराष्ट्रात ४५ जागा महायुतीच्या माध्यमातून जिंकणार असून पंतप्रधान मोदी यांच्या विजयात महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार असल्याची खात्री प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी व्यक्त केली. मला खात्री आहे की निवडणूक बिनविरोध होणार आहे. आमची रिक्त जागा आमच्याकडेच राहणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, पक्षाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते मुकेश गांधी आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
अशोक चव्हाणांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला
माझं ‘सासर’ हेच माझं ‘सौभाग्य’, सोनिया गांधींची ‘रायबरेलीकरांना भावनिक साद
अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा ‘ईडी’चे समन्स
Latest Marathi News ‘काही गोष्टी गुलदस्त्यातच…’ प्रफुल्ल पटेलांनी सांगितले खासदारकी असतानाही का भरला अर्ज? Brought to You By : Bharat Live News Media.
