30 पेक्षा अधिक गुन्हे असलेला सराईत चोरटा जेरबंद

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल साडेअकरा लाख रुपयांची रोकड चोरणार्या आणि 30 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला खडक पोलिसांनी बोपखेल फाटा येथे बेड्या ठोकल्या. रामकेवल राजकुमार सरोज (वय 46, रा. शिक्रापूर रोड, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरीची घटना 2 फेब्रुवारीला टिंबर मार्केट परिसरात घडली होती.
महेश नाळे 2 फेब्रुवारीला मार्केट परिसरात गेले. दुचाकी पार्किंग केल्यानंतर पाळत ठेवून चोरट्याने साडेअकरा लाखांची रोकड चोरली. टिंबर मार्केटसारख्या व्यापारी क्षेत्रात भरदिवसा 11 लाख 50 हजार रुपयांची चोरी झाल्याने आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे एपीआय राकेश जाधव यांनी तपासाला सुरुवात केली.
दोन पथकांकडून तपास सुरू करीत आठ दिवस दोन्ही मार्गांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी बोपखेल फाटा परिसरात असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून रामकेवलला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरलेली रक्कम बँक ऑफ बडोदा, अहमदनगर शाखा आणि अॅक्सीस बँक, चाकण शाखा बँकेतील स्वतःच्या खात्यावर जमा केली. त्यानंतर सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या त्याच्या पत्नीच्या खात्यावर जमा केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी पत्रव्यवहार करून बँकांची ही खाती गोठवली आहेत.
सहायक पोलिस आयुक्त रक्मीणी गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलिस निरीक्षक संपतराव राऊत, संदीप तळेकर, किरण ठवरे, हर्षल दुडम, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, लखन ढावरे, टेंबुर्णे, रफिक नदाफ, आशिष चव्हाण यांनी ही कारवाई केली.
500 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
अंमलदार किरण ठवरे, संदीप तळेकर, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, सागर कुडले, प्रशांत बडदे यांनी आठ दिवस घटनास्थळापासून ते दिघी, विश्रांतवाडी परिसरातील सरकारी आणि खासगी असे मिळून 500 पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले. चोरट्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मुंबई आयुक्तालयात असे चोरीचे 30 गुन्हे दाखल आहेत.
Latest Marathi News 30 पेक्षा अधिक गुन्हे असलेला सराईत चोरटा जेरबंद Brought to You By : Bharat Live News Media.
