Crime News : बिल्डरसह 15 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वाघोली पोलिस चौकीसमोरच तरुणाने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत बिल्डरसह 15 जणांविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर सचिन जाधव (वय 39, रा. गोकूळ पार्क, वाघोली), गजानन आबनावे, लता गजानन आबनावे, संग्राम आबनावे, सायली आबनावे, डॉ. पाचारणे व इतर 9 जण (सर्व रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली) अशी आरोपींची नावे आहेत. सिद्धी अपार्टमेंट व बकोरी फाटा येथे 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता ही घटना घडली होती. रोहिदास जाधव (वय 29) हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात रोहिदासच्या 26 वर्षीय भावाने तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रोहिदास येथील एका इमारतीत राहतो. ही इमारत सचिन यांनी बांधली आहे. त्यांनी सोसायटीतील काही फ्लॅट दलित समाजातील लोकांना विकले. गरिबीचा फायदा उचलून त्यांना फ्लॅटमधून बाहेर काढणे सोपे जाईल, असा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांनी सोसायटीचे पार्किंग, टेरेस व इतर सुविधा वापरण्यास नकार दिला. त्यावरून वाद झाल्यानंतर रोहिदासला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, सोसायटीत सर्व जण जमून त्याची अडवणूक केली. त्याला काठीने, चपलेने, हाताने मारहाण केली. याबाबत त्याने वाघोली पोलिस चौकीत तक्रार दिली. पण, पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केला. त्यानंतरही वाद झाल्यानंतर रोहिदास पोलिस चौकीत गेला. तेव्हा त्याला सकाळी येण्यास सांगितले. सकाळी आला असता त्याला चार तास बसवून ठेवले. या नैराश्यातून त्याने पोलिस चौकीसमोरच पेटवून घेतले. यात तो 80 ते 85 टक्के भाजला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सचिन याच्यासह 15 जणांवर गुन्हा नोंद केला. सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील तपास करीत आहेत.
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंकित वाघोली चौकीत पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याच्या रागातून तरुणाने पोलिस चौकीसमोर पेटवून घेतले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांची उचलबांगडी विशेष शाखेत करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या कारवाईने दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वत:ला पेटवून घेणारा तरुण मृत्यूशी झुंज देत आहे.
Latest Marathi News Crime News : बिल्डरसह 15 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.
