राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता सुनावणीचा आज निकाल

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीचा आज, गुरुवारी निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सायंकाळी साडेचार वाजता निकालपत्राचे वाचन करणार आहेत. निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार गटाला मूळ पक्ष ठरवत चिन्ह बहाल केले. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात, याकडे लक्ष असणार आहे. (NCP MLA Disqualification Case)
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट राज्यातील युती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांसमोर आले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात आमदार अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर नार्वेकरांसमोर सुनावणी झाली. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी सुनावणीचे कामकाज संपले. (NCP MLA Disqualification Case)
केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला होता. या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहातून नार्वेकर काय निकाल देणार, याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, शिवसेना आमदारांच्या अपात्रता सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांच्या कोणत्याच आमदाराचे निलंबन केले नव्हते. एकनाथ शिंदेकडे पक्ष असल्याचा निर्वाळा नार्वेकरांनी दिला. मात्र, शिंदेंचे प्रतोद भरत गोगावले यांनी योग्य पद्धतीने व्हिप बजावला नसल्याचे सांगत ठाकरे गटाला निलंबित करण्याचे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालात कोणालाही निलंबित न करण्याचे धोरण कायम ठेवले जाणार की वेगळा निर्णय होणार, याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादीच्या सुनावणीत व्हिपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांच्या आमदारांवर टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे. (NCP MLA Disqualification Case)
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नव्या इनिंगचे बीजारोपण; शिवबंधन सोडल्याची चर्चा
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार
शिवसेनेचे आजपासून कोल्हापुरात राष्ट्रीय अधिवेशन
सोशल इंजिनिअरिंग ते राजकीय पुनर्वसन; राज्यसभा उमेदवारीतून भाजपची खेळी
Latest Marathi News राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता सुनावणीचा आज निकाल Brought to You By : Bharat Live News Media.
