मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नव्या इनिंगचे बीजारोपण; शिवबंधन सोडल्याची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिर्डी लोकसभा मतदारसंघात दावा ठोकणाऱ्या माजी मंत्री बबनराव घोलप यांना झुलत ठेवणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अंगलट येण्याची शक्यता गडद झाली आहे. घोलप हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या मनःस्थितीत असून, त्याचे बीजारोपण मंगळवारच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाल्याची चर्चा आहे. घोलप यांनी सोडचिठ्ठी दिल्यास तो ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे. गेल्या … The post मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नव्या इनिंगचे बीजारोपण; शिवबंधन सोडल्याची चर्चा appeared first on पुढारी.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नव्या इनिंगचे बीजारोपण; शिवबंधन सोडल्याची चर्चा

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
शिर्डी लोकसभा मतदारसंघात दावा ठोकणाऱ्या माजी मंत्री बबनराव घोलप यांना झुलत ठेवणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अंगलट येण्याची शक्यता गडद झाली आहे. घोलप हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या मनःस्थितीत असून, त्याचे बीजारोपण मंगळवारच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाल्याची चर्चा आहे. घोलप यांनी सोडचिठ्ठी दिल्यास तो ठाकरे गटाला मोठा धक्का असणार आहे.
गेल्या चार दशकांपासून शिवसेनेसोबत असलेल्या घोलप यांनी पक्षफुटीनंतर ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याआधीपासून त्यांना अनुसूचित जाती (एससी)साठी राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. स्वाभाविकच त्यांनी तशी तयारी चालवली होती. तथापि, शिर्डीचेच माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा रंगल्याने घोलप यांच्यामधील अस्वस्थता वाढली. आपली नाराजी त्यांनी थेट मातोश्रीवरदेखील बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याची दखल न घेता उलट नाशिकमध्ये वेळोवेळी झालेल्या प्रमुख बैठकांमध्ये त्यांना सामावून घेण्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. आताही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगर-शिर्डी दौऱ्यावर असताना घोलपांनी दांडी मारून मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
स्वत: घोलप यांनी आपण चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले असले तरी या भेटीतच त्यांच्या नव्या राजकीय इनिंगचे बीजारोपण झाल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. घोलप हे लवकरच ठाकरेंचे शिवबंधन सोडून शिंदे गटाच्या पालखीचे भोई होणार आहेत. घोेलप यांनी तसा निर्णय घेतल्यास त्यांना मानणारा जिल्ह्यातील मोठा गटदेखील त्यांच्यासोबत जाणे अपरिहार्य ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर घोलप यांच्याबाबत नव्या घडामोडी केव्हा घडतात, याकडे जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटांचे लक्ष लागून राहणार आहे.
शिवसेना विस्तारण्यात महत्त्वाचा वाटा…
शिवसेना उपनेते, मनोहर जोशी मंत्रिमंडळात समाजकल्याण मंत्री आणि पाच वेळा देवळाली मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांचा एकत्रित शिवसेना विस्तारित करण्यात महत्त्वाचा वाटा राहिला आहे. प्रशांत हिरे, उत्तमराव ढिकले, माणिकराव कोकाटे आदी मूळ काँग्रेस संस्कृतीतील बड्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. तथापि, गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्हा शिवसेनेतील गट-तटाच्या राजकारणात त्यांचे नेतृत्व दुर्लक्षित झाले. काही महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांना डावलण्यात आले. याचा परिणाम त्यांनी स्वत:हून पक्षीय बैठकांना येणे टाळण्याचे धोरण स्वीकारले. ही परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटावयास नको, अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसत आहेत.
.. तर त्यांचे स्वागतच; भाऊसाहेब चौधरींची सूचक प्रतिक्रिया
दरम्यान, यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता मंगळवारी झालेली बैठक ही केवळ चर्मकार समाजाच्या मागण्यांसंदर्भात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत खा. राहुल शेवाळे आणि सदाशिव लोखंडे यांचीही उपस्थिती होती. मात्र, यावेळी पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाल्याचा चौधरी यांनी इन्कार केला. तथापि, घोलप यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागतच आहे, अशी सूचक प्रतिक्रिया चौधरी यांनी व्यक्त केली.
हेही वाचा:

Mela Terminus Nashik | पुणे, कोल्हापूरसाठी मेळा बसस्थानकावरून सुटणार बस
Maratha Arkshan Andolan | मागण्या मान्य करा; अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक
IND vs END 3rd Test : तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकत भारताचा फलंदाजीचा निर्णय

Latest Marathi News मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नव्या इनिंगचे बीजारोपण; शिवबंधन सोडल्याची चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.