मिरजेसह सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजारांचा फैलाव विचारात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुसार जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेची ही महाविद्यालये असून, बुधवारी बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सहा महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी 173 कोटी 88 लाख रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे. पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल. या महाविद्यालयांत उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येणार आहेत. नंदुरबार व गोंदिया येथील परिचर्या महाविद्यालयांसाठी (नर्सिंग महाविद्यालय) केंद्राच्या योजनेनुसार प्रत्येकी एका महाविद्यालयाला 10 कोटी रुपये इतका निधी दिला जाणार आहे. यापैकी केंद्र शासन 60 टक्क्यांप्रमाणे 6 कोटी व राज्य शासन 40 टक्क्यांप्रमाणे 4 कोटी इतका निधी देईल. बांधकाम, फर्निचर, यंत्रसामग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च यासाठी प्रत्येकी नर्सिंग महाविद्यालयाला 32 कोटी 97 लाख रुपये आवश्यक असून, या खर्चासही मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे; तर जळगाव, लातूर, बारामती व सांगली (मिरज) येथील नर्सिंग महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इत्यादीसाठी अंदाजे 107 कोटी 94 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
Latest Marathi News मिरजेसह सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.
