राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांना मिळणार बेदाणा

सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याबाबतचे आदेश शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व शिक्षण अधिकार्यांना दिल्यामुळे राज्यातील सुमारे सव्वा कोटी विद्यार्थी लाभार्थी ठरू शकतात. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष शेती व बेदाणा बाजारपेठेला मोठी चालना मिळणार आहे.
जिल्ह्यात द्राक्षे व बेदाण्याचे उत्पादन प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुलनेत शेतकर्यांना कमी दर मिळतो. त्यामुळे बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा याबाबत दैनिक ‘Bharat Live News Media’ने बातम्या, विशेष वृत्त देऊन आवाज उठवला होता. लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना, द्राक्ष बागायतदार संघ, व्यापारी संघटना यांच्याकडून ही मागणी होत होती. त्यावर गेल्या वर्षी सरकारने घोषणा केली, मात्र अंमलबजावणी झाली नव्हती. आता ती होईल.
कमी पाण्यात, मुरमाड जमिनीत चांगले उत्पन्न मिळवून देणारे म्हणून द्राक्ष पीक ओळखले जाते. जिल्ह्याच्या दुष्काळी भागात टेंभू, ताकारी, म्हैशाळ, आरफळ या पाणी योजनांचे पाणी गेल्यानंतर द्राक्ष बागांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. त्याशिवाय जिल्ह्याच्या पश्चिम भागातही द्राक्षाचे क्षेत्र वाढले. द्राक्षाला कमी दर मिळाल्यानंतर द्राक्षापासून बेदाणा तयार करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वाढत्या क्षेत्राचा फारसा परिणाम द्राक्ष उत्पादनावर सुरुवातीला झाला नाही. मात्र काही वर्षात द्राक्ष आणि बेदाणा दोन्हीचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. महागाईच्या तुलनेत दर वाढले नाहीत, उत्पादनाचा खर्च मात्र वाढला.
दोन-तीन वर्षांत बेदाण्याचे उत्पादन वाढले. बेदाण्याचा उठाव मात्र अपेक्षित होत नव्हता. त्यामुळे बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, अशी मागणी होती. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनही केले. दोन वेळा मोर्चा काढला. याची दखल घेऊन पावसाळी अधिवेशनात हा निर्णय जाहीर झाला, मात्र आठ महिने झाले तरी अंमलबजावणी झाली नव्हती.
जयंत पाटील यांच्याकडून पाठपुरावा
शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समाविष्ट करावा याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभेत सातत्याने पाठपूरावा सुरु होता.
बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांना न्याय
बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा या अनेक वर्षापासूनच्या मागणीची अंमलबजावणी सुरु होईल. आता शेतकर्यांच्या बेदाण्यास चांगला दर मिळेल. त्यासाठी बाजार समितीचा प्रयत्न असेल, असे सांगली बाजार समितीचे अध्यक्ष सुजय शिंदे यांनी सांगितले.
अखेर स्वाभिमानी संघटनेने लढाई जिंकली. प्रत्यक्ष मुलांना बेदाणा पोहेचेपर्यंत आमचा पाठ पुरावा सुरू राहील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी नमूद केले.
द़ृष्टिक्षेपात द्राक्षे व बेदाणा उत्पादन
जिल्ह्यात एकूण द्राक्ष क्षेत्र 33 हजार 849 हेक्टर
द्राक्षापासून बेदाणा होणारे क्षेत्र 30 टक्के
जिल्ह्यात तयार होणारा बेदाणा दीड लाख टन
हिरवा बेदाणा 80 टक्के , पिवळा बेदाणा 20%
रेसिड्यू फ्री निर्यात होणारा बेदाणा चार हजार मॅट्रिक टन
जिल्ह्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकरी एक लाख पाच हजार
Latest Marathi News राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांना मिळणार बेदाणा Brought to You By : Bharat Live News Media.
