शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट लवकरच काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची चर्चा बुधवारी दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मंगळवारी पक्षाच्या काही नेत्यांसह शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ बुधवारी पवार यांनी आपल्या गटाच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. त्यावरून ही अटकळ बांधली जात होती. दरम्यान, पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र ही शक्यता फेटाळली आहे. (Sharad Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांतील वादावर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने कौल दिला आहे. त्यांच्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाच अचानक विलीनीकरणाच्या चर्चेला वेग आला आहे.
पवार यांनी बोलावलेल्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीत विलीनीकरणाच्या शक्यतेवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना ही शक्यता फेटाळली. पक्षाच्या एखाद्या नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य केले असेल तर त्याची मला माहिती नाही. त्यांनी कशाच्या आधारावर हे वक्तव्य केले याची विचारणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करावी लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. (Sharad Pawar)
बांदल यांचे वक्तव्य
शरद पवार गटाचे पदाधिकारी मंगलदास बांदल यांनी पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यावर चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली होती.
Latest Marathi News शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? Brought to You By : Bharat Live News Media.