
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : फेब्रुवारी महिन्यात प्रेम फुलतं.. बहरतं म्हणतात, पण १५ वर्षीय प्रेयसी अन् १८ वर्षीय प्रियकराच्या प्रेमाचा मात्र ऐन व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला दी एंड पाहायला मिळाला. हे प्रेमप्रकरण प्रियकराला चांगलेच महागात पडले. प्रेयसीच्या आईने दोघांना सोबत पाहताच प्रियकराला पकडून धु-धु धुतले. एवढ्यावरच थांबेल ती प्रेयसीची आई कसली, तिने प्रियकराला रस्त्याने बदडत थेट सिडको ठाण्यात नेले. त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला. सिडको पोलिसांनीही प्रियकराला अटक करून जेलमध्ये टाकले. राहुल दीपक चव्हाण (१८, रा. जटवाडा) असे प्रियकराचे नाव आहे. त्याची न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, एका दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत राहूलने ओळख काढली. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. राहुल हा मागील एक महिन्यापासून त्या मुलीच्या शाळेबाहेर येऊन उभा राहायचा. शाळा सुटल्यानंतर तिला भेटायचा. मंगळवारी (दि. १३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलगी शाळेतून बाहेर आली तेव्हा राहुलने तिचा हात धरला. नेमके त्याचवेळी मुलीची आई शाळा परिसरात आली होती. तिने सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर मुलीच्या आईने पुढे जाऊन मुलीचा हात सोडविला. यावेळी राहुलने विरोध करत मुलीच्या आईवर हात उचलला. यावेळी राहुलला चोप दिला. राहुलला पकडून रस्त्याने फटके देत थेट सिडको पोलिस ठाण्यात नेले. शाळा परिसरातच हा प्रकार घडल्याने तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मुलीची आई एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी पीडिता अल्पवयीन असल्याने स्वत:हून तक्रार देत राहुलविरुद्ध विनयभंग आणि पोक्साेनुसार गुन्हा दाखल केला.
‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमाचा ‘दी एंड; हर्सूल जेलमध्ये प्रियकराची रवानगी
गुन्हा दाखल झाल्यावर तपास अधिकारी उपनिरीक्षक शिंदे यांनी आरोपी राहुल चव्हाण याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
Latest Marathi News ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमाचा ‘दी एंड’; प्रेयसीच्या आईने प्रियकराला धु-धु धुतले अन् ठाण्यात नेले Brought to You By : Bharat Live News Media.
