अवैध धंदे आढळल्यास ठाणेप्रमुखावर कारवाई : पोलिस अधीक्षक पंकज देशमुख

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात अवैध धंदे चालणार नाहीत, याबाबत माझा कटाक्ष आहे. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निष्पन्न होईल, त्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखावर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला आहे. नारायणगाव (ता. जुन्नर) येथे देशमुख यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चौदा नंबर येथील अनंत पतसंस्थेत दोन वर्षांपूर्वी झालेल्या दरोड्याचा व त्या संस्थेच्या व्यवस्थापकाच्या खुनाचा तपास पोलिसांना अद्याप लागला नाही, याची खंत पोलिसांना आहे. नव्याने तपास केला जाईल व गुन्हेगाराचा तपास लावू. गुन्ह्यात अथवा अपघातातील अनके वाहनांचा साठा प्रत्येक पोलिस ठाण्यात पाहायला मिळतो. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल; जेणेकरून पोलिस ठाण्याच्या आवारात या वाहनांचा अडथळा ठरणार नाही.
प्रत्येक पोलिस ठाण्यात सामान्य माणसाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. गुन्हेगाराला कायद्याचे भय असावे. कायदा पाळणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आहेत. पोलिस आपले मित्र असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न राहील, असेही देशमुख यांनी सांगितले.
Latest Marathi News अवैध धंदे आढळल्यास ठाणेप्रमुखावर कारवाई : पोलिस अधीक्षक पंकज देशमुख Brought to You By : Bharat Live News Media.
