नानेगावला पाचवा बिबट्या जेरबंद, अजून दोन मोकाट

देवळाली कॅम्प : Bharat Live News Media वृत्तसेवा- नानेगाव येथे उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात पाचवा बिबट्या अडकला आहे. त्यानंतरही दोन बिबटे मोकाटच फिरत असल्याने त्यांची धास्ती कायम असल्याची माहिती माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी पिंजरा कायम ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दारणाकाठच्या नानेगाव परिसरात बिबट्यांचा बारमाही वावर आहे. परिणामी, शेतकरी व शेतमजुरांसाठी शेती शिवारातील काम करणे जोखमीचे झाले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये लागोपाठ एकाच ठिकाणी तीन बिबटे जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर बिबट्यांचे सातत्याने दर्शन घडत राहिले. विजेचा लपंडाव, त्यात दिवसा वीज मिळत नाही. परिणामी, रात्री-अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाताना शेतकरी धास्तावतात. जीवावर उदार होऊनच रात्री शेतात जावे लागत असल्याचे शेतकरी सांगतात.
गेल्या १५ दिवसांपासून नानेगावमधील शेतकऱ्यांना शेतीची कामे करीत असताना बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे रात्री, पहाटेच नव्हे तर दिवसादेखील शेतात जाण्यासाठी मजूर येत नव्हते. याची दखल घेत वनविभागाने शेतकरी मनोहर बबन शिंदे यांच्या गट नंबर ४३४ मधील उसाच्या क्षेत्रात पिंजरा लावला होता. काही दिवस त्यास हुलकावणी दिली. मात्र, सोमवारी पहाटेच्या सुमारास साधारण अडीच ते तीन वर्षांचा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि शेतकरी, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वन अधिकारी विजयसिंह पाटील व अशोक खांजोडे यांनी त्यास सुरक्षितरीत्या गंगापूर रोपवाटिका येथे आणले. त्याच्यावर उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे.
अद्यापही पूर्ण वाढ झालेले दोन बिबटे या परिसरात मुक्तपणे संचार करीत असून, त्यांच्यापासून नागरिकांच्या जीविताला धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा. – ज्ञानेश्वर शिंदे, माजी सरपंच
हेही वाचा :
Nashik News : येवलेकरांनो, गंगासागर तलावाच्या सौंदर्यात पडणार आता भर
सोनिया गांधींचा राज्यसभेसाठी अर्ज; प्रियांका गांधी लोकसभा लढणार? रायबरेली किंवा अमेठीचा पर्याय
Latest Marathi News नानेगावला पाचवा बिबट्या जेरबंद, अजून दोन मोकाट Brought to You By : Bharat Live News Media.
