Pune : भोरमध्ये काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात

अर्जुन खोपडे
भोर : लोकसभा जिंकायचीच, यासाठी कंबर कसलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचा दिल्लीचा मार्ग भोर विधानसभेतून ठरणार, हे निश्चित आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीत असलेले काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे हे आमदार आहेत; परंतु त्यांची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीमध्ये नेत्यांची गर्दी तर मतदार कुठे? असा प्रश्न पडत आहे. भोर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम थोपटे यांची जबरदस्त मोठी पकड असल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांना भरघोष मताधिक्क्याने निवडून दिले. या वेळी काँग्रेस -शिवसेना – राष्ट्रवादी यामध्ये इंडिया आघाडी पक्षाची स्थापना झाली असताना आमदार संग्राम थोपटे हे इंडिया आघाडी पक्षात दिसत असले तरी त्यांची भूमिका लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलदस्त्यात राहणार का? असे मतदारांमध्ये बोलले जात आहे.
भोर विधानसभा मतदारसंघ हा दुर्गम डोंगरी असल्यामुळे या मतदारसंघाची व्याप्ती ही भोर-वेल्हा-मुळशी अशा तीन तालुक्यात विभागली आहे. प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गटा- तटाचे राजकारण खूप आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट पडले असल्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होणार का? अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. खा. सुळे यांच्या अस्तित्वाची तर अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. सत्ताधारी अजित पवार गटाकडे भोर मतदारसंघातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक रेवणनाथ दारवडकर, निर्मला जागडे, नियोजन समिती सदस्य अमित मोरे, मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, वेल्हा तालुका अध्यक्ष किरण राऊत यांनी हात मिळवणी केली आहे. भोर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या दोन पक्षांची साथ येणार्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला होणार असल्यामुळे त्यांची ताकद मोठी झालेली दिसत असली तरी मतदार हे त्यांच्यासोबत असतील का? असा प्रश्न आहे. भोर विधानसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक प्रतिनिधी जरी नसले तरी सुळे या विकासाच्या माध्यमातून मतदारांच्या घराघरांमध्ये पोचल्या आहेत.
भोर – मुळशी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद मोठी असल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना फायदा होणार आहे.
भोर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण
दगडे पाटील, माजी आमदार शरद ढमाले यांनी आरएसएसच्या माध्यमातून प्रत्येक गावात भारतीय जनता पक्षाची चांगली बांधणी केली, याचा अजित पवार गटालाही फायदा होणार आहे. भोर विधानसभा मतदारसंघात भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यांचा समावेश होतो. येथून 2009 मध्ये 71 हजार, 2014 मध्ये अवघे 17 हजार, 2019 मध्ये 19, 504 मताधिक्य सुळेंना मिळाले होते. 2009 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात नेत्यांची गर्दी मोठी असून मतदार कोठे असा प्रश्न पडत असून येणार्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, शिवसेनेचे दोन गट पडले असल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय भूमिका घेतील यावर खरी लढत ठरणार आहे.
Latest Marathi News Pune : भोरमध्ये काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात Brought to You By : Bharat Live News Media.
