चौदाव्या शतकातील लोखंडी हातमोजे!

झुरिच : स्वित्झर्लंडमधील पुरातत्त्व संशोधकांनी चौदाव्या शतकातील लोखंडी ‘गाऊंटलेट’चा शोध घेतला आहे. हे लोखंडी हातमोजे त्या काळातील एखाद्या उमराव, योद्ध्याचे असावेत असे त्यांना वाटते. झुरिचपासून 18 किलोमीटरवर असलेल्या कायबर्ग कॅसलजवळील मध्ययुगीन शहरामध्ये केलेल्या उत्खननात हे हातमोजे सापडले.
हे हातमोजे म्हणजेच खरे तर चिलखताचाच एक भाग आहे. या चौपदरी हातमोजांमध्ये वेगवेगळ्या लोखंडी प्लेट्स आहेत. त्या माशाच्या खवल्यांप्रमाणे एकावर एक ठेवलेल्या आहेत. प्रत्येक तुकडा स्वतंत्रपणे मोजाच्या कातडी किंवा कापडी भागाला अडकवता येतो. या गाऊंटलेटचा अन्य 50 धातूंच्या वस्तू व कलाकृतींसह शोध लावण्यात आला. त्यामध्ये एक हातोडा, चाकू, किल्ल्यांचाही समावेश आहे. झुरिच युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे उत्खनन केले.
स्वित्झर्लंडमध्ये प्रथमच चौदाव्या शतकातील असे गाऊंटलेट सापडले आहे. यापूर्वी सापडलेले सर्वात जुने गाऊंटलेट हे पंधराव्या शतकातील होते. स्वित्झर्लंडमध्ये आतापर्यंत असे पाच गाऊंटलेट सापडलेले आहेत. मात्र, त्यामध्ये आता सापडलेले हे गाऊंटलेट अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित राहिलेले आहे.
Latest Marathi News चौदाव्या शतकातील लोखंडी हातमोजे! Brought to You By : Bharat Live News Media.
