विदेशी भूमीवरील युद्धांचा गुलाबाला फटका !

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रेयसीला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करू इच्छिणार्या प्रियकराच्या खिशावरील ताण यंदा कमी होणार आहे. कारण रशिया व युक्रेन, हमास व इस्रायल यांच्यामधील युध्दामुळे डच गुलाबाची परदेशातील निर्यात घटली आणि स्थानिक बाजारात यंदा दर्जेदार गुलाब लाखोंच्या संख्येने विक्रीसाठी दाखल झाले. आवक जास्त असल्याने गतवर्षी 50 ते 60 रुपयांना मिळणारे एक फूल यंदा 30 ते 40 रुपयांना मिळू लागले आहे. दरम्यान, प्रेम व्यक्त करताना कमी पैशांत जास्त फुले मिळणार असल्याने प्रेमवीरांना यंदाचा व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहाचा राहणार आहे.
हजारो शब्दांतून जे व्यक्त होऊ शकणार नाहीत ते गुलाबाचे एक सुंदर फूल सांगून जाते. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर गुलाब देऊन प्रेम व्यक्त केले जाते. ही पद्धत आजच्या डिजिटल युगातही तितकीच जगभवर लोकप्रिय आहे. त्यामुळे दरवर्षी 1 ते 7 फेब—ुवारी दरम्यान युरोपमार्गे रशिया व लाल समुद्रमार्गे इस्त्रायलमध्ये दर्जेदार डच गुलाबांची निर्यात करण्यात येते. मात्र, सध्या रशिया व युक्रेनमधील युध्दजन्य परिस्थितीमुळे युरोपमधून होणारी डच गुलाबांची निर्यात यंदा कमी झाली आहे. मध्य पूर्व भागात इस्त्राईल व हमास यांमधील युध्दामुळे देशातून लाल समुद्रातून जहाजामार्गे गुलाब पाठविण्यात येतात.
त्यालाही अडथळे आले आहेत. त्यामुळे, निर्यातदारांनी आपला मोर्चा हवाई वाहतूकीकडे वळविला. मात्र, कार्गो विमानांवर यापूर्वीच भार वाढल्यामुळे वेळेत बुकींग झाले नाही. तसेच, दरही वाढल्याने फुल निर्यात दारांना फुले पाठविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे विदेशाला जाणारी फुले स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झाली. मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारात मागील तीन दिवसांत तब्बल 7 लाख 70 हजार 320 फुलांची आवक झाली. गतवर्षी ही आवक 5 लाख 60 हजार 920 इतकी होती. त्यामध्ये, 2 लाख 10 हजार 400 फुलांनी वाढ झाली. परिणामी, घाऊक बाजारात 20 फुलांच्या गड्डीला 150 ते 230 रुपये भाव मिळाला. मागील वर्षी हा भाव 150 ते 300 रुपये इतका होता. एकीकडे डच गुलाबांचे दर कमी झाल्याने प्रेमवीरांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे दर कमी झाल्याने शेतकरी वर्गाकडून मात्र निराशा व्यक्त करण्यात येत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत 20 फुलांच्या गड्डीत 70 रुपयांची घसरण झाली आहे. घाऊकसह किरकोळ बाजारातही फुले स्वस्त होणार असून, व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या खरेदीकडे तरुणाईचा कल राहील.
– सागर भोसले, समन्वयक, फुलबाजार अडते असोसिएशन
गतवर्षीप्रमाणे यंदा चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदा 250 रुपयांच्या पुढे दर गेले नाहीत. लागवडीत वाढ होण्यासह निर्यातही कमी झाल्याने यंदा हंगाम चांगला राहिला नाही.
– विठ्ठल उमाप, शेतकरी, जातेगाव, जि. शिरूर
हवाई वाहतुकीद्वारे फुलांची वाहतूक करणे परवडणारे नसल्याने जवळपास तीस टक्के निर्यातक्षम फुले स्थानिक बाजारपेठांमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे यंदा दर्जेदार डच गुलाब बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. तसेच, त्यांचे दरही एरवीच्या तुलनेत कमी आहेत.
– नरेंद्र पाटील, सोएक्स फ्लोरा, डच गुलाबाचे निर्यातदार
हेही वाचा
‘घुसखोर’ प्रवाशांचे आव्हान
हिंदू मंदिराचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन
आदमापूर, गारगोटी, घाटकरवाडीत आंतरवाहिनी रस्ता
Latest Marathi News विदेशी भूमीवरील युद्धांचा गुलाबाला फटका ! Brought to You By : Bharat Live News Media.
