अशोक चव्हाणांच्या हाती ‘कमळ’

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मला कोणीही काँग्रेस सोडायला सांगितले नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केला आहे. येथेही प्रामाणिक आणि सकारात्मक काम करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. आणखी नेते संपर्कात असून तेही लवकरच आमच्या सोबत येतील, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांवर बोलताना, काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला किंवा सदस्याला भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह केला नाही. ते विषय फडणवीस आणि बावनकुळे पाहतील. त्यांना मदत लागली तर मी करेन, असे संकेतही चव्हाणांनी दिले.
भाजप प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे, मंत्री गिरीश महाजन, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर आदी नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा पार पडला.
चव्हाण यांच्यासह त्यांचे समर्थक, माजी आमदार अमर राजूरकर यांनी भाजपत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही
नेत्यांना रीतसर पक्षाचे सदस्यत्व दिले. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केला आहे. विकासाच्या मुख्य धारेत योगदान करण्याची संधी द्या, कुठल्याही पदाची मला अपेक्षा नाही, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
चव्हाण यांच्या प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि महायुतीची शक्ती वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारताला भारताला विकसित देशाकडे नेण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे प्रेरित होऊन अनेक नेत्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावे, असे वाटत आहे. त्यातील एक प्रमुख नेतृत्व म्हणून चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या येण्याने महायुतीला मोठे बळ मिळेल, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेस सोडणे हा सोपा निर्णय नव्हता. माझा मतदारसंघ, माझा जिल्हा, माझे राज्य आघाडीवर नेण्यासाठी विकासाच्या मुख्य प्रवाहात जावे, असे ठरवले. काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी भरपूर केले. परंतु, मीही पक्षासाठी खूप काही दिले आहे. भाजपत येताना मी कोणत्याही प्रकारची मागणी केलेली नाही. ते सांगतील ती जबाबदारी स्वीकारणार आहे. भाजपच्या ध्येय-धोरणानुसार देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे काम करणार असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. आज राजकीय आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. 38 वर्षांच्या राजकीय प्रवासात बदल करून भाजपत प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करू. आजवर सकारात्मक आणि विकासात्मक भूमिका घेऊन मी राजकीय काम केले. आगामी निवडणुकीत भाजपला अधिकाधिक यश कसे मिळेल, यासाठी माझ्या अनुभवाचा वापर करेन. व्यक्तिगत टीका, दोषारोप कोणावरही करणार नसल्याचेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
तिथे चव्हाणांची मदत घेऊ : फडणवीस
अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला पक्के ठाऊक आहे आणि आम्ही तो योग्य ठिकाणी घेऊच, असे सांगत फडणवीस यांनी यावेळी काही विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आगामी पक्षप्रवेशाचे संकेत दिले. योग्य वेळी अशोक चव्हाणांच्या अनुभवाचा लाभ घेतला जाईल. भाजप प्रवेशासाठी आम्ही टार्गेट घेऊन चालत नाही. ज्यांच्या येण्याने पक्षाला, महाराष्ट्राला फायदा असेल, त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे. आणखी काही नेते आमच्या संपर्कात आहेत. जमिनीशी नाळ जोडलेले नेते आमच्यासोबत येतील, असेही फडणवीस म्हणाले.
तो एक राजकीय अपघात : अशोक चव्हाण
आदर्शप्रकरणी उच्च न्यायालयात निकाल आमच्या बाजूने लागला आहे. त्याला काहीजणांनी आव्हान दिले असले तरी ती कायदेशीर प्रक्रिया असून ती पूर्ण होईल. तो एक राजकीय अपघात होता असे म्हणेन आणि त्यावरून मी पुरेसे सहन केल्याचे चव्हाण म्हणाले.
सवयीनुसार काँग्रेस असा उल्लेख..
अशोक चव्हाण यांनी पक्ष प्रवेशाच्या सुरुवातीला आशिष शेलार यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा उल्लेख केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तेव्हा फडणवीसांसह इतर नेत्यांनी काँग्रेस नव्हे, भाजप, असे सांगितले. त्यावर कालच राजीनामा दिला आहे. इतक्या वर्षांचा सराव, त्यामुळे सांभाळून घ्या, असे सांगत चव्हाण यांनी बाजू सावरली.
Latest Marathi News अशोक चव्हाणांच्या हाती ‘कमळ’ Brought to You By : Bharat Live News Media.
