‘कचारगड’ कोयापुनेम महोत्सव : आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुहेत रंगणार भाविकांचा मेळा
गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ‘कचारगड’ येथे दरवर्षी कोयापुनेम महोत्सवानिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येत असून देशभरातील लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. यंदा 22 ते 26 फेब्रुवारीदरम्यान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा पाच दिवस लाखो भाविकांचा मेळा या गुहेत रंगणार आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी या यात्रेचा आढावा घेत संबंधित विभागाला नेमून दिलेली कामे सुव्यवस्थित करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेत दरवर्षी कोयापुनेम महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून देशातील लाखो भाविक या यात्रेला हजेरी लावतात. दरम्यान, यंदा 22 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचा आढावा घेत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा. पार्कींगची व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी. व्हीआयपी मान्यवरांच्या आगमनाप्रसंगी हेलिपॅडची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात बॅरिकेटींग लावण्यात यावे तसेच परिसरातील रस्त्याच्या खड्डयांची डागडूजी करावी. विद्युत महामंडळाने वीज पुरवठा अखंडीत सुरु राहील याची दक्षता घ्यावी. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन टीसीएल क्लोरीनेशन करावे. आरोग्य विभागाने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा. यात्रेत दुकाने लावतांना 20 फुटाचे अंतर ठेवून दोन्ही बाजुला दुकाने लावण्यात यावे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्नीशमनची व्यवस्था करावी. एसटी महामंडळाने भाविकांसाठी पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. आदी निर्देश संबंधित विभागाला दिले.
Latest Marathi News ‘कचारगड’ कोयापुनेम महोत्सव : आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुहेत रंगणार भाविकांचा मेळा Brought to You By : Bharat Live News Media.
