मुलानेच केली वडिलांची खलबत्त्याने हत्या; आईला मारहाण केल्याचा राग अनावर

अमरावती; Bharat Live News Media वृत्तसेवा : नेहमी आईसोबत भांडण करून मारहाण करणाऱ्या वडिलांची मुलानेच खलबत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येणाऱ्या सायत येथे घडली आहे. राजेश श्रीराम मिसाळ (५५) असे मृतक वडीलाचे तर अंकुश राजेश मिसाळ (२९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला मंगळवारी अटक केली.
राजेश आणि त्याच्या पत्नीचे नेहमी घरात वाद व्हायचे. या वादातून तो पत्नीला नेहमी मारहाण करायचा. सोमवारी त्याने पत्नीला मारहाण केली. याची माहिती दर्यापूर तालुक्यातील कोकर्डा येथे आजीकडे राहायला असलेला मुलगा अंकुश याला समजली. त्यामुळे त्याने थेट सायत गाठले. घरी पोहोचताच मुलाने वडिलांना आईला केलेल्या मारहाणीचा जाब विचारला. दरम्यान वडील आणि मुलामध्ये शाब्दिक वाद झाला.हा वाद विकोपाला जाऊन राग अनावर झालेल्या मुलाने वडिलांवर खलबत्त्याने हल्ला चढविला. डोक्यावर गंभीर इजा झाल्याने वडील राजेशचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला. पोलीसांनी या प्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहेत.
Latest Marathi News मुलानेच केली वडिलांची खलबत्त्याने हत्या; आईला मारहाण केल्याचा राग अनावर Brought to You By : Bharat Live News Media.
