सीनातून आवर्तन सोडण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : सीना धरणातून आवर्तन सोडण्यास उशीर होत असल्यामुळे माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांनी टंचाई आढावा बैठकीत संताप व्यक्त केला. गैरहजर असलेले कार्यकारी अभियंता किरण देशमुख हे कोणाच्या तरी दबावात काम करतात, असा आरोप करीत त्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत बैठकीतून हटणार नाही, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी घेताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सीना धरणातून आर्वतन सोडण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी टंचाई उपाययोजना करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख गैरहजर होते.
शेतीसाठी कर्जत तालुक्यातील निमगाव गांगार्डा येथून सीना धरणाचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली होती. पाणी सोडले जात नसल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. याबाबत आमदार शिंदे यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला. कार्यकारी अभियंता गैरहजर होते. मात्र त्यांनी मोबाईलद्वारेे बैठकीत सहभाग नोंदविला. आवर्तनासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी मागितली असल्याचे त्यांनी सांगताच, आमदार शिंदे अधिकच भडकले. आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी कधी घेतली जाते, नियम काय म्हणतो, सध्या सीना धरणात पाणी किती आहे, उपलब्ध पाण्यापैकी उपयुक्त पाणी किती, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार त्यांनी कार्यकारी अभियंता देशमुख यांच्यावर केला.
कार्यकारी अभियंता कोणाच्या तरी दबावात असून, आर्वतनाबाबत जनतेच्या मनात शासनाविरोधात संताप निर्माण होईल अशी त्यांची कृती आहे. आवर्तन सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय मी बैठकीतून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी व्यक्त करीत, बेजबाबदार कार्यकारी अभियंता देशमुख यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री विखे यांच्याकडे केली. आमदार राम शिंदे यांनी मागणी करताच, सीनातून आर्वतन सोडण्याचे निर्देश पालकमंत्री विखे यांनी दिले.
Latest Marathi News सीनातून आवर्तन सोडण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश Brought to You By : Bharat Live News Media.
