बंड शंकररावांचे, विलासरावांचे आणि अशोकरावांचे ….

उमेश काळे, छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देत पक्षाविरूध्द बंड केले. त्‍यांनी आज  (दि. १३) भाजपमध्‍ये प्रवेश केला. यानिमित्ताने मराठवाड्यातून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या अन्य काँग्रेस नेत्यांनी कधी ना कधी केलेल्या बंडाच्या कहाण्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. शंकरराव चव्‍हाणांची महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. … The post बंड शंकररावांचे, विलासरावांचे आणि अशोकरावांचे …. appeared first on पुढारी.

बंड शंकररावांचे, विलासरावांचे आणि अशोकरावांचे ….

उमेश काळे, छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देत पक्षाविरूध्द बंड केले. त्‍यांनी आज  (दि. १३) भाजपमध्‍ये प्रवेश केला. यानिमित्ताने मराठवाड्यातून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या अन्य काँग्रेस नेत्यांनी कधी ना कधी केलेल्या बंडाच्या कहाण्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
शंकरराव चव्‍हाणांची महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस
अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. नांदेडचे नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास. १९७५ साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा मराठवाड्यात विकास आंदोलनाचा जोर होता आणि प्रदिर्घकाळ मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतराव नाईकांना हटवावे अशी मागणी पुढे आली आणि चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात पश्‍चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते वसंतदादा पाटील हे होते. शंकररावांच्या कडक स्वभावामुळे त्यांचे दादांशी फारसे जमले नाही. दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाल्यानंतर शंकररावांनी वसंतदादांना मंत्रिमंडळातून वगळले. मात्र बाहेर पडल्यानंतर दादांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. त्यामुळे संतप्त झालेल्या शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देत १९७७ साली विखे-पाटील यांना सोबत घेत महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. या पक्षाला निवडणुकीत प्रभाव दाखविता आला नसला तरी त्यानंतर शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्‍यांनी अर्थमंत्रीपद सांभाळले. जनता पक्क्षाचा डोलारा कोसळल्यानंतर चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये आले. इंदिरा गांधीपासून पी. व्ही. नरसिंहरावपर्यंत झालेल्या काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रिपदे सांभाळली. महाराष्ट्राचे दुस-यांदा मुख्यमंत्री होण्याची संधीही त्यांना मिळाली.
विलासरावांचे बंड
विलासराव देशमुख हे मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते. १९८९ मध्ये राजीव गांधी यांनी शरद पवारांकडे राज्याची सूत्रे सोपविली. त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये नुकताच विलिन झाला होता. परिणामी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज होते. १४ फेब्रुवारी १९९१ रोजी सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांनी बंडाचा झेंडा हाती घेत शरद पवार यांना हटविण्याची मागणी केली. हे बंड नंतर शमले. या बंडाला दिल्लीतील श्रेष्ठींचा आशीर्वाद होता हे नंतर स्पष्ट झाले.
१९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासरावांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर विधानपरिषदेसाठी लागलेल्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी विलासरावांची इच्छा होती; पण विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेचे तिकिट देऊ नये असे पक्षाने ठरविले. त्यामुळे विलासरावांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत अर्ध्या मताने विलासराव पडले. त्यानंतर ते पुन्हा पक्षात सक्रिय झाले आणि मुख्यमंत्री झाले. ‘ मी विधानपरिषद निवडणूक हरलो म्हणून बरे झाले, नाहीतर मुख्यमंत्री झालो नसतो’ अशी मिश्किल प्रतिक्रिया एका कार्यक्रमात विलासरावांनी दिली होती.
गोपीनाथरावांची नाराजी
मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात गोपीनाथराव मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. भाजपला तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. परंतु प्रमोद महाजन यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षात आपले कोणी ऐकत नाही ही भावना त्यांनी छ. संभाजीनगर येथे व्यक्त करून नाराजी नोंदविली होती. त्यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास नक्की होता. पण शरद पवार यांनी त्यांना भाजप न सोडण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्यांनी ऐकला व नंतर केंद्रीय स्तरावर ते पोहचले.
अशोक चव्हाणांच्‍या बंडामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान
आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आल्यामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसचा मोठा चेहरा भाजपने खेचल्यामुळे भाजपचा जनाधार आणखी वाढण्यास मदत होईलच. नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्याप्रमाणेच मराठवाड्यातील उर्वरित भागात चव्हाण यांच्या राजकीय कौशल्याचा भाजप पुरेपूर वापर करणार हे नक्की. चव्हाणांमुळे भाजपला मराठा समाजाचा नेता मिळाला.
हेही वाचा : 

Ashok Chavan in BJP: ‘पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन…’- भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
Ashok Chavan Join BJP : अखेर अशोक चव्हाण भाजपवासी! फडणवीसांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश
“मुंबई काँग्रेसचे अध्‍यक्ष…” भाजप प्रवेशावेळी अशोक चव्‍हाणांची ‘स्लिप ऑफ टंग’!

 
 
Latest Marathi News बंड शंकररावांचे, विलासरावांचे आणि अशोकरावांचे …. Brought to You By : Bharat Live News Media.