लाखोंचा खर्च करूनही अधिकार्यांच्या दालनात इंटरनेट चालेना !

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध अधिकार्यांचे इंटरनेट वारंवार बंद होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनातील इंटरनेट वेगात चालत नसल्याने त्यांनीही संताप व्यक्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे इंटरनेट यंत्रणा सुधारण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाची धावपळ सुरू झाली आहे. महापालिका भवन, क्षेत्रीय कार्यालय, विभागीय करसंकलन कार्यालय, शाळा, गोदाम व इतर ठिकाणी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून इंटरनेट कनेक्शन घेतले आहे. त्यासाठी दरमहा लाखो रुपये शुल्क महापालिका भरत आहे.
अनेक अधिकार्यांचे इंटरनेटसेवा मध्येच बंद पडते. बैठकीच्या वेळी ते संथ होते. काम करतानाही अनेकदा कमी गतीने इंटरनेट चालते. त्यामुळे अधिकारी वैतागले आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे तक्रारी करूनही त्यात सुधारणा होत नसल्याचे ते खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. आयुक्तांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत इंटरनेट चालत नसल्याने त्यांना व्यवस्थितपणे बैठक घेता आली नाही. तसेच, त्यांच्या दालनातील इंटरनेट सतत बंद पडत असल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली. ही घटना नुकतीच घडली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने इंटरनेटसेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दरमहा लाखो रुपये खर्च करूनही इंटरनेट सेवा योग्य वेगाने मिळत नसल्याने अधिकारी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहेत. मनस्ताप नको म्हणून काही अधिकारी स्वत:चे इंटरनेट वापरत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिका भवनातील वायफाय दोन वर्षापासून बंदच
महापालिकेच्या प्रत्येक दालनात तसेच, आवारात वायफाय यंत्रणा बसविण्यात आली आहेत. भिंतीवर लावलेले वायफायचे पांढरे डबे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हे डबे लावून दोनपेक्षा अधिक वर्षे झाले आहेत. मात्र, अद्याप वायफाय सुरू झालेले नाही. त्यामुळे त्यासाठी केलेला खर्च वाया गेल्याचे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी खासगीत बोलत आहेत.
तांत्रिक कारणांमुळे इंटरनेटचा वेग मंदावतो
महापालिका भवन इमारतीमध्ये नामांकित कंपनीकडून इंटरनेट सेवा घेतली जात आहे. अती वेगवान इंटरनेट सेवा प्रणाली महापालिकेने स्वीकारली आहे. मात्र, पुरवठा करणार्या केबलमध्ये कोठे बिघाड झाल्यास, हबमध्ये गडबड झाल्यास किंवा तांत्रिक कारणांमुळे इंटरनेटचा वेग कमी होतो. त्यामुळे असे प्रकार होत आहेत. वायफाय यंत्रणा सुरू करण्याबाबत चाचणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर वायफाय सुरू करण्यात येतील, असे महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.
हेही वाचा
पिंपरीत चक्क ‘डॉग पार्क’!
गोंदिया: नवरगावचे सरपंच, उपसरपंचाविरोधातील अविश्वास ठराव मंजूर
यंदाही ड्रेनेज सफाईच्या निविदा कमी दराने; काम व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
Latest Marathi News लाखोंचा खर्च करूनही अधिकार्यांच्या दालनात इंटरनेट चालेना ! Brought to You By : Bharat Live News Media.
