मृत्युदंड ठोठावलेल्या आठ भारतीय अधिकार्‍यांची कतारकडून मुक्तता

नवी दिल्ली : कतारमध्ये कथित हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आठ भारतीय माजी नौदल अधिकार्‍यांची मुक्तता झाली आहे. भारतीय मुत्सद्देगिरीचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. काही महिन्यांच्या तुरुंगवासानंतर कतारच्या न्यायालयाने सोमवारी आपल्या कोठडीत असलेल्या सर्व आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांची सुटका केली. त्यापैकी सात भारतात परतले आहेत. दरम्यान या अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र … The post मृत्युदंड ठोठावलेल्या आठ भारतीय अधिकार्‍यांची कतारकडून मुक्तता appeared first on पुढारी.

मृत्युदंड ठोठावलेल्या आठ भारतीय अधिकार्‍यांची कतारकडून मुक्तता

नवी दिल्ली : कतारमध्ये कथित हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आठ भारतीय माजी नौदल अधिकार्‍यांची मुक्तता झाली आहे. भारतीय मुत्सद्देगिरीचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. काही महिन्यांच्या तुरुंगवासानंतर कतारच्या न्यायालयाने सोमवारी आपल्या कोठडीत असलेल्या सर्व आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांची सुटका केली. त्यापैकी सात भारतात परतले आहेत. दरम्यान या अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष धन्यवाद दिले आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मध्यरात्री एक निवेदन जारी करून, कतारमधील भारतीयांच्या सुटकेची माहिती दिली. या सर्वांना फाशीच्या शिक्षेतून मुक्त करण्याच्या कतारमधील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून ते मायदेशी परतल्याबद्दल समाधानही व्यक्त करण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर या माजी नौदल अधिकार्‍यांचे आगमन झाले तेव्हा ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
प्रकरण नेमके काय?
कतारमधील दाहरा ग्लोबल कंपनीसाठी पाणबुडी प्रकल्पावर काम करणारे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांना ऑगस्ट 2022 मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तुरुंगात असलेल्या या आठही जणांना कतारच्या न्यायालयाने ऑक्टोबर 2023 मध्ये देहदंडाची शिक्षा ठोठावल्याने भारतात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.
इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला होता. तथापि, या सर्वांवर ठेवलेल्या आरोपांबद्दल कतार सरकारने कोणताही तपशील जाहीर केला नव्हता. भारत सरकारने हा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगून या कर्मचार्‍यांना कायदेशीर मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर या शिक्षेला आव्हान देणारी याचिका कतारच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. तत्पूर्वी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या आठही जणांच्या कुटुंबीयांची दिल्लीत भेट घेऊन भारत सरकाकडून केल्या जाणार्‍या मदतीची माहिती दिली होती.
मोदींनी घेतली होती अमीर शेख यांची भेट
या कर्मचार्‍यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मोठे योगदान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईच्या दौर्‍यात तेथील अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याकडे हा विषय उपस्थित केला होता. त्याला अमीर शेख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचवेळी परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि डोवाल यांनीही सातत्याने कतार सरकारशी संपर्क ठेवला. पडद्यामागे करण्यात आलेल्या या प्रयत्नांतून आठही भारतीय कर्मचार्‍यांची मुक्तता झाली आहे.
तुर्किये आणि अमेरिकेशीही संपर्क
तुर्कियेचे राजघराणे आणि कतारचे राजघराणे यांचे संबंध जिव्हाळ्याचे असल्यामुळे भारतीय अधिकार्‍यांनी तुर्कियेच्या माध्यमातून कतार सरकारशी संपर्क साधला. त्याचबरोबर कतारच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अमेरिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांशीही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने संपर्क ठेवला होता. या सगळ्या घडामोडींचा एकत्रित परिणाम होऊन अखेर या सर्व अधिकार्‍यांची सन्मानपूर्वक सुटका झाली.
सुटकेचे श्रेय पंतप्रधान मोदींना
कतार तुरुंगातून सुटलेल्या माजी नौदल अधिकार्‍यांनी या सुटकेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाशिवाय ही मुक्तता शक्य झालीच नसती. भारत सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे घडले. भारतात परतल्यानंतर माजी नौदल अधिकार्‍याने सांगितले की, मायदेशी परतण्यासाठी जवळपास 18 महिने वाट पाहिली होती. पंतप्रधान मोदी यांनी या सुटकेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि मुत्सद्देगिरीबद्दल या अधिकार्‍याने कृतज्ञता व्यक्त केली. भारत सरकारने केलेल्या प्रत्येक प्रयत्नासाठी आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत आणि त्या प्रयत्नांशिवाय आजचा दिवस शक्य झाला नसता, असेही या अधिकार्‍याने नमूद केले.
The post मृत्युदंड ठोठावलेल्या आठ भारतीय अधिकार्‍यांची कतारकडून मुक्तता appeared first on Bharat Live News Media.

Go to Source