कापुस खरेदी केंद्र कधी सुरु करणार ? अनिल देशमुख यांचा सवाल

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य सरकारच्या वतीने कापूस खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. लवकरच खरेदी केंद्र सुरु करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले परंतु खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत. यामुळे राज्यशासन कापूस खरेदी केंद्र कधी सुरु करणार ? असा प्रश्न माजी गृहमंत्री व शरद पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.
राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा सन २०१९-२० मध्ये शेवटचे बोंड खरेदी करेपर्यत खरेदी केंद्र सुरु ठेवले होते. साधारणपणे मार्च-एप्रिल पर्यत शासनाच्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. त्याकाळात ऑगष्ट महिन्यापर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवून जवळपास ९६ लाख क्विंटल इतकी विक्रमी कापसाची खरेदी झाली होती. यामुळे खुल्या बाजारात सुध्दा कापसाला १४ हजार रुपयापर्यत भाव मिळाला. परंतु सध्याच्या परिस्थितीत कापसाला बाजारात केवळ ६ हजार ४०० रुपये भाव मिळत आहे. यात साधा उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी शासनाला वेळ नसल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
आयात निर्यात धोरण अत्यंत चुकीचे असल्यामुळे सुध्दा कापसाचे भाव कमी झाले आहेत. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दबावाखाली मोठया प्रमाणात विदेशातून कापूस हा आयात करण्यात आला. जो परदेशात निर्यात व्हायला हवा तो झाला नाही. हा विषय केंद्र सरकारचा असला तरी राज्य सरकारने यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. कापसाला १४ हजार रुपये भाव मिळाला तरच कापूस उत्पादकांना परवडेल असे मत सुध्दा अनिल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला पणन महासंघाचे नवनिर्वाचित संचालक राजाभाऊ देशमुख, सुरेश चिंचोळकर, प्रसनजीत पाटील, शिरीष धोत्रे, उषाताई शिंदे, सुनिता उळसपुरे, राजेंद्र केशवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नुकसानीचे पंचनामे करा
दरम्यान,गेल्या दोन दिवसापासुन नागपूर जिल्हासह विदर्भात मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपिटीने फळबाग, रब्बी पिके व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी. मागील वर्षी जे अवकाळी व गारीपिटेने नुकसान झाले त्याची अद्यापही मदत मिळालेली नाही, ती मदत सुध्दा लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी सुध्दा अनिल देशमुख यांनी यावेळी केली.
Latest Marathi News कापुस खरेदी केंद्र कधी सुरु करणार ? अनिल देशमुख यांचा सवाल Brought to You By : Bharat Live News Media.
