BSNL कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १३ ते १७ फेब्रुवारी निषेध सप्ताह

छत्रपती संभाजीनगर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉइज ही बी एस एन एल कर्मचारी संघटना दि. १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी देशभर निषेध सप्ताह पाळून आपल्या मागण्यांकडे सरकारचे व व्यवस्थापनाचे लक्ष वेधनार आहेत. एन एफ टी इ ने पुकारलेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम चंद्रप्रकाश जगताप, सचिव कॉम रंजन दाणी, कोषाध्यक्ष कॉम शिवाजी चव्हाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम दीपक जाधव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सचिव भान सिंग पोहल, अध्यक्ष मुकेश शिंगाडे, व कोषाध्यक्ष नंदू पाटील, श्रीमती मीरा भुजांगे यांनी केले आहे.
संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बी एस एन एल मधील कर्मचाऱ्यांचे प्रश्न अत्यंत तीव्र झालेले आहेत. गेल्या १७ वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन करार मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर भत्त्यामधे गेल्या २२ वर्षांपासून कोणतीही वाढ दिलेली नाही. आऊटडोअर मेडिकल बिलाच्या खर्चासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने पेमेंट केले जाते. मात्र कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा दिली जात नाही. गेल्या चार वर्षांपासून या विभागातील अनुकंपा भरती बंद करण्यात आली असून मृत कर्मचाऱ्यांची शेकडो कुटुंब हलाखीचे जीवन व्यतीत करत आहेत. त्यांना एकरकमी भरपाई सुध्दा दिली जात नाही. अधिकाऱ्यांना दर पाच वर्षांनी मिळणारे प्रमोशन कर्मचाऱ्यांना मात्र ७ ते ८ वर्षानंतर दिले जाते. वेतन करार व नवीन प्रमोशन पॉलिसी दिली जात नसल्याने आज बी एस एन एल मधील क आणि ड वर्गातील हजारो कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ देखील बंद आहे. र्षानुवर्षे एकाच बेसिकवर काम करत असल्याने कर्मचाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहेत.
अशा अनेक समस्या सांगत संघटनेने संताप व्यक्त केला असून यासाठी मा. पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. एकूणच कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांकडे सरकारचे व व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १३ फेब्रु ते १७ फेब्रुरीपर्यंत देशपातळीवर लक्षवेधी निषेध सप्ताह पाळण्यात येत आहे.
Latest Marathi News BSNL कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन! १३ ते १७ फेब्रुवारी निषेध सप्ताह Brought to You By : Bharat Live News Media.
