देशात 17 कोटी बॉटल्स युरिया उत्पादन

सांगली : रासायनिक खतांत शेतकर्‍यांच्या सर्वाधिक पसंतीचा असलेला युरिया आता बॉटलमधून मिळणार आहे. सातत्याने भासणारा तुटवडा आणि करावी लागणारी आयात यावर उपाय म्हणून आता बॉटलचा पर्याय आला आहे. दरम्यान, येत्या हंगामात यासाठीच्या प्रस्तावित तीन प्रकल्पांतून केंद्र सरकार तब्बल 17 कोटी बॉटलबंद युरियाचे उत्पादन करणार आहे. देशात सातत्याने युरियाचा वापर वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला विदेशातून … The post देशात 17 कोटी बॉटल्स युरिया उत्पादन appeared first on पुढारी.

देशात 17 कोटी बॉटल्स युरिया उत्पादन

विवेक दाभोळे

सांगली : रासायनिक खतांत शेतकर्‍यांच्या सर्वाधिक पसंतीचा असलेला युरिया आता बॉटलमधून मिळणार आहे. सातत्याने भासणारा तुटवडा आणि करावी लागणारी आयात यावर उपाय म्हणून आता बॉटलचा पर्याय आला आहे. दरम्यान, येत्या हंगामात यासाठीच्या प्रस्तावित तीन प्रकल्पांतून केंद्र सरकार तब्बल 17 कोटी बॉटलबंद युरियाचे उत्पादन करणार आहे.
देशात सातत्याने युरियाचा वापर वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला विदेशातून मोठ्या प्रमाणात युरियाची आयात करावी लागते. आतापर्यंत पोत्यातून युरियाचे वितरण होत होते. मात्र यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाढतो. परिणामी युरियाची आयात पूर्णपणे थांबविण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने विविध उपाययोजना आखत आहे. यातीलच एक भाग म्हणून देशात तीन स्वदेशी नॅनो युरिया निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या माध्यमातून तब्बल 17 कोटी नॅनो युरिया बॉटल्सची निर्मिती केंद्र सरकार करणार आहे.
दोन राज्यात तीन प्रकल्प
स्वदेशी नॅनो युरिया निर्मितीचे प्रकल्प गुजरात, उत्तर प्रदेशात उभारण्यात आले आहेत. गुजरातमध्ये कलोल येथे इफ्कोच्या मदतीने बॉटलबंद युरिया निर्मिती करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात फुलपूर आणि आंवला येथे दुसरे दोन प्रकल्प उभारलेले आहेत.
या तिन्ही प्रकल्पांतील उत्पादन क्षमता ही 17 कोटी बॉटल्स इतकी आहे. एक बॉटल ही 500 मिलीलिटरची आहे. याच्याच जोडीला गुजरातमध्येच आणंद येथे नॅनो सायन्स् आणि रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अन्य एका वार्षिक 4.5 कोटी बॉटल्स उत्पादनाची घोषणा करण्यात आलेली आहे.
दरम्यान, भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) संशोधन केंद्र आणि विविध कृषी महाविद्यालये यांच्या माध्यमातून विविध भागामध्ये धान्य, गहू, मोहरी, मका, टोमॅटो, कोबी, काकडी, शिमला मिरची, कांदा आदी पिकांवर नॅनो युरियाची चाचणी करण्यात आलेली आहे. यामुळे आता फवारणीच्या माध्यमातून या पिकांना सामान्य युरियाऐवजी नॅनो युरियाचा वापर करणे शक्य होणार आहे. तसेच यामुळे आता युरियाची आयात पूर्णपणे थांबवणे शक्य होणार आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चात देखील मोठीच बचत होणार आहे.
दरम्यान, सन 2022-23 मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधित युरियाच्या विक्रीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ती आता 207.63 लाख टन इतकी नोंदवली आहे, तर मागील वर्षी याच हंगामात युरियाची विक्री ही 192.61 लाख टन इतकी झाली होती.
दरम्यान, संपलेल्या खरीप हंगामात डीएपी आणि युरियाचा वापर वाढला आहे. खरीप पिकाच्या हंगामात युरिया आणि डीएपीचा जास्त वापर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 13 लाख टन युरिया आणि 10 लाख टन डीएपीची वाढ झाली आहे.
त्याचप्रमाणे खरीप हंगामात 1.8 कोटी टन खतांचा वापर करण्यात आला आहे. युरियाच्या वापरात 13 लाख टनांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगामाच्या तुलनेत डीएपीचा वापर 10 लाख टन अधिक वाढणार असल्याची शक्यता कृषी मंत्रालयाने वर्तवली आहे.
दरम्यान, रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. मात्र उत्पादकता आणि जमिनीचा पोत खराब होत आहे. रासायनिक खतांचा अतिवापर जमिनीचा पोत बिघडू शकतो. त्यामुळं आवश्यक असल्यासच रासायनिक खतांची मात्रा द्यावी, अन्यथा सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील गेल्या दोन दशकांमध्ये रासायनिक खतांचा वापर प्रचंड वाढला आहे. सध्या महाराष्ट्रात 70 लाख टनाहून अधिक खतांचा वापर होत असल्याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
 
Latest Marathi News देशात 17 कोटी बॉटल्स युरिया उत्पादन Brought to You By : Bharat Live News Media.