श्रीनाथ म्हस्कोबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
सासवड : Bharat Live News Media वृत्तसेवा : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे पौष अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. भाविकांना समस्त पान व्यापार्यांच्या वतीने महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. दुसरीकडे देवस्थान ट्रस्टमार्फत दि. 24 फेवारी रोजी होणार्या यात्रेची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली. अमावस्येनिमित्त शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी 6 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आला. 10 वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या.
धुपारती करून देवाची पालखी सर्व लवाजम्यासह वाजत-गाजत श्रीक्षेत्र घोडेउड्डाण येथे निरा नदी स्नानासाठी गेली. दुपारी 2 वाजता पालखी सर्व लवाजम्यासह मंदिरात परतली. देऊळवाड्यातील दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. यात्रेनिमित्त मंदिर परिसरातील डागडुजी, रंगरंगोटी, परिसर स्वच्छता, वाहनतळ व्यवस्था आदी यात्रा काळातील नियोजन केले जात असल्याचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. तर देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज-जनरेटर, दर्शनबारी, तीन ठिकाणी वाहनतळ, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, पोलिस बंदाबस्त आदी सोयीसुविधा पुरविण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले. विश्वस्त खजिनदार अमोल धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, नामदेव जाधव, दत्तात्रय समगीर, संजय कापरे, राजेंद्र कुरपड आदी या वेळी उपस्थित होते.
Latest Marathi News श्रीनाथ म्हस्कोबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा Brought to You By : Bharat Live News Media.