आठवले यांचे पुन्हा शिर्डीतून लढण्याचे सूतोवाच
श्रीरामपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिर्डीत 2009 मध्ये माझा पराभव झाला. मात्र मी पुन्हा 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून लढण्यासाठी इच्छुक आहे. रिपब्लिकन पक्षाला शिर्डीसह दोन जागा देण्याची मागणी भाजपच्या वरिष्ठांकडे केली आहे; मात्र भाजप वरिष्ठांसह राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयावर ठरेल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट करत, शिर्डीतून निवडणूक लढविण्याचे सूतोवाच पुन्हा एकदा केले. आठवले शनिवारपासून (दि.3) शिर्डीसह श्रीरामपूर, कोपरगावच्या दौर्यावर आले आहेत. या दौर्यात शिर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, आठवले यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले.
आठवले म्हणाले, भाजपच्या वरिष्ठांकडे रिपाइंला शिर्डीसह दोन जागांची मागणी केली आहे. शिर्डीत मी 2009मध्ये निवडणूक लढविली होती; मात्र पराभव झाला. आता मी पुन्हा 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीच्या जागेकरिता इच्छुक आहे. पण भाजपच्या वरिष्ठांसह राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्णय काय होईल, त्यावर ठरेल. माझे राज्यसभा सदस्यत्व 2026पर्यंत आहे. लोखंडे हेही माझे चांगले मित्र आहेत. संध्या मी संपूर्ण देशात पक्ष वाढविण्याच्या कामात व्यस्त असून देशासह राज्यात प्रत्येक तालुक्यात पन्नास हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते रिपाइंशी जोडले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाठेब ठाकरे यांनी माझ्यासमोर शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा मी डॉक्टर, विचारवंत, पत्रकार व तळागाळातील कार्यकर्त्यांकडे गेलो. त्यांचा विचार घेऊनच पावले उचलली. त्यांचा फायदा झाला, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
आंबेडकरांबद्दल शक्यता
‘उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली ही मोठी चूक केली. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचे कारनामे कळताच ते पुन्हा येणार, असा विश्वास व्यक्त करत आम्ही त्यांचे पुन्हा आल्यास स्वागतच करू,’ तसेच ‘प्रकाश आंबेडकर हे दलित नेते आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर युती होईल, असे वाटत नाही, कदाचित ते शेवटच्या क्षणी स्वबळाचा नारा देऊ शकतात,’ अशा शक्यताही त्यांनी व्यक्त केल्या.
फुले, साठे यांना ‘भारतरत्न’साठी प्रयत्न
संविधान बदलण्याच्या हालचाली झाल्यास पहिला मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा देऊन आठवले म्हणाले की, संविधान बदलण्याची केवळ अफवा आहे. मागासवर्गीयांची दिशाभूल करण्याचे काम होत आहे. व्ही. पी. सिंह सरकारने बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ दिला. आता महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळावा म्हणून प्रयत्न करणार असून लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या पक्षकार्यास भारतरत्न मिळाला याचे स्वागतच आहे.
Latest Marathi News आठवले यांचे पुन्हा शिर्डीतून लढण्याचे सूतोवाच Brought to You By : Bharat Live News Media.