नगर, शिर्डीत उमेदवारीची ‘नो गॅरंटी’!

लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘गॅरंटी’ हा शब्द अनेकांच्या तोंडी असला तरी नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांना मात्र उमेदवार कोण याची ‘गॅरंटी’च राहिलेली नाही. महायुतीत नगर भाजपकडे, तर शिर्डी शिवसेनेकडे (शिंदे) असे जागावाटप आहे. महाविकास आघाडीत मात्र नगर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असला, तरी शिर्डीच्या जागेसाठी मात्र काँग्रेस-शिवसेना (उबाठा) अशी रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतील इच्छुक पाहता डॉ. सुजय विखे, … The post नगर, शिर्डीत उमेदवारीची ‘नो गॅरंटी’! appeared first on पुढारी.

नगर, शिर्डीत उमेदवारीची ‘नो गॅरंटी’!

संदीप रोडे

लोकसभा निवडणुकीपूर्वीच ‘गॅरंटी’ हा शब्द अनेकांच्या तोंडी असला तरी नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांना मात्र उमेदवार कोण याची ‘गॅरंटी’च राहिलेली नाही. महायुतीत नगर भाजपकडे, तर शिर्डी शिवसेनेकडे (शिंदे) असे जागावाटप आहे. महाविकास आघाडीत मात्र नगर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असला, तरी शिर्डीच्या जागेसाठी मात्र काँग्रेस-शिवसेना (उबाठा) अशी रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतील इच्छुक पाहता डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे या दोन्ही विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळणार की दुसराच चेहरा समोर येणार, याची ‘गॅरंटी’ ना उमेदवारांना आहे, ना त्यांच्या समर्थकाना! मविआकडे तर उमेदवार कोण? हेच अजून ठरेना. निवडून येण्याची ‘गॅरंटी’ नसल्याने मविआकडे उमेदवारांची वाणवा असल्याची चर्चा आहे!
नगर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रातील बलाबल पाहिले तर भाजप पिछाडीवर दिसत असले तरी लोकसभा मात्र भाजप जिंकत असल्याचे आजवरचे चित्र. त्यातच ‘मोदी सरकारच्या गॅरंटी’मुळे भाजपकडे आ. राम शिंदे, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य भानुदास बेरड यांची नावे चर्चेत असतानाच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आ. नीलेश लंके यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजप आमदार राम शिंदे यांच्याशी असलेला ‘दोस्ताना’ पाहता त्यांचा पक्ष नेमकी कोणता असेल, याचा अंदाज आताच वर्तविणे मात्र अशक्य आहे. मविआकडे आ. रोहित पवार, आ. प्राजक्त तनपुरे, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, आ. शंकरराव गडाख यांची नावे असली, तरी यातील ढाकणे सोडता विद्यमान तिघे आमदार लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. राष्ट्रवादीकडे तर उमेदवारच नाही, दुसरीकडे भाजपमध्ये मात्र उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. असे असले तरी भाजपमध्ये उमेदवारी देताना ‘सर्व्हे फॅक्टर’ महत्त्वाचा मानला जातो. सर्व्हेत उणेदुणे झाले तर उमेदवारी मिळेल की नाही याची ‘गॅरंटी’ महायुतीच्या नगर, शिर्डीतील विद्यमान खासदारांनाही नाही. त्यामुळेच भाजपमधील पदाधिकारी उमेदवारी कोणाला?, याकडे डोळे लावून बसले आहेत.
शिर्डीचे विद्यमान खासदार शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेल्याने तेथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची सारी भिस्त घरवापसी केेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरच आहे. त्यात मविआच्या जागावाटप बैठकीत शिर्डीच्या जागेवर काँग्रेसने दावा ठोकल्याने वाकचौरे यांना उमेदवारी मिळेल की नाही याचीच ‘गॅरंटी’ राहिलेली नाही. गतवेळी ही जागा काँग्रेसने लढूनही हरली होती. तरीही या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहेत. त्यामागे ‘इंडिया’त ‘वंचित’ची एन्ट्री फॅक्टर असल्याची चर्चा आहे. ‘वंचित’चे शिर्डीत हक्काचे मतदार असून त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे गणित त्यासाठी मांडले जात आहे.
सुप्रिया सुळे यांचेही नाव चर्चेत!
बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. शरद पवारांचा पारंपरिक असलेल्या या मतदारसंघात सुप्रिया सुळे तीन टर्म खासदार आहेत. मात्र सुनेत्रा-सुप्रिया यांच्यात लढत झाल्यास पवार कुटुंबातील गृहकलह थेट लोकांपुढे येईल. तो टाळण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्यासाठी नगर हा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे सुळे या नगर लोकसभेच्या उमेदवार असू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. सुळे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना (उबाठा), काँग्रेसही आग्रही असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जाते. सुळे नगरला आल्या, तर मात्र इथली लोकसभेची निवडणूक चुरशीची होईल, यात शंका नाही.
 
Latest Marathi News नगर, शिर्डीत उमेदवारीची ‘नो गॅरंटी’! Brought to You By : Bharat Live News Media.