काही जण शेवटची निवडणूक म्हणून साद घालतील; भुलू नका : अजित पवार

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : यंदाच्या निवडणुकीत काहीजण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साद घालतील. पण त्याला भुलू नका. माझ्याच विचाराचा खासदार बारामतीतून निवडून द्या. बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असू द्या, मीच उमेदवार आहे, असे समजून त्याला निवडून द्या, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्यावर रविवारी हल्लाबोल केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टीका करत त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. बारामतीत राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी अजित पवार यांनी हे आवाहन केले. ते म्हणाले, गंभीर समस्येतून आपण जात आहोत. एकीकडे अजित सांगतो असं करा, दुसरीकडे वरिष्ठ सांगतात तसं करा, कुणाचं ऐकायचं, माझी एवढीच विनंती आहे, एवढे दिवस वरिष्ठांचे ऐकले, आता माझं ऐका, असे पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून मी मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेल. आजवर मी राज्य सरकारकडून कामे करून घेत होतो. केंद्रातूनही बारामतीसह मतदारसंघातील अन्य तालुक्यांसाठी मी निधी आणत विकास करणार आहे. आतापर्यंत असे किती आमदार-खासदार येऊन गेले, आपल्या आजूबाजूला देखील किती आमदार आणि खासदार होऊन गेले. पण, आपल्या अडचणींना कोण आपल्याला उपयोगी पडतंय याचाही विचार आपण करा, असे पवार म्हणाले.
मी उमेदवार समजून मतदान करा
काहींना उपाध्यक्ष मी केले, अध्यक्ष मी केले, करोडो रुपयांची जागा नाममात्र दराने घेऊन दिली. कधीही कुठली अडचण येऊ दिली नाही; मात्र काय झालं माहीत नाही. त्यांचं जोरात काम चाललं आहे. काही जण मला मुंबईत भेटले. आमची चूक झाली, दादा, तुमच्याशिवाय कुणी काम करू शकत नाही, असे ते म्हणाले. काहींची तर अडचण मला समजू शकते, असेही ते म्हणाले.
खा. सुप्रिया सुळे यांना टोला
आपल्या विचारांचा खासदार असेल तर कामे झपाट्याने होतील. विकासकामे करणारा खासदार आपल्याला हवा आहे, फक्त इकडे तिकडे फिरणारा नको, या शब्दांत अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला.
सुनेत्रा पवार असतील उमेदवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीत वेगवेगळ्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे व आवाहनामुळे त्यांच्या गटाकडून पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेच्या उमेदवार असतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
हेही वाचा
हिमाचल प्रदेशात हिमवर्षावामुळे ४८५ रस्ते बंद
छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून चाकूने भोसकून तरुणाची हत्या; मारेकरी पसार
कामाख्या कॉरिडॉरचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
Latest Marathi News काही जण शेवटची निवडणूक म्हणून साद घालतील; भुलू नका : अजित पवार Brought to You By : Bharat Live News Media.
