नंदुरबार : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काकाला ठोठावली दहा वर्षाची शिक्षा

नंदुरबार; Bharat Live News Media वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला जिल्हा सत्र न्यायालयाने पोक्सो कायदयान्वये 10 वर्षे सश्रम कारावासाची आणि 10 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने शिक्षा ठोठावलेला आरोपी पीडित मुलीचा चुलत काका आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका 8 वर्षीय पिडीत बालिकेवर चुलत काकाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे हा गुन्हा नोंद झाला. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली होती.
विसरवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा.पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सदरचा गुन्हयाचा तपास पोउपनिरीक्षक भुषण बैसाणे यांच्याकडे दिला. बैसाणे व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश-2, नंदुरबार येथील न्यायालयात आरोपी विरोधात मुदतीत दोषारोपपत्र सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश-2, नंदुरबार यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका वय-8 वर्षे, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश-2, नंदुरबार यांनी आरोपीतास भा.द.वि.क.-376 अन्वये दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावास व रुपये 5000/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावास व रुपये 5000/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति.सरकारी अभियोक्ता ॲड. बी.यु.पाटील यांनी काम यांनी पाहिले. तसेच पैरवी अधिकारी पोउपनिरीक्षक राहुल भदाणे, पैरवी अंमलदार पोहेकॉ/170 नितीन साबळे व पोना/947 गिरीष पाटील यांनी कामकाज पाहिले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति.सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.
Latest Marathi News नंदुरबार : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काकाला ठोठावली दहा वर्षाची शिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.
