ऐन सीझनमध्ये नाट्यगृहे बंद का?; रसिकांचा सवाल
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ऐन कार्यक्रमांच्या सीझनमध्ये बालगंधर्व रंगमंदिर, श्रीगणेश कला क्रीडा मंच, पंडित भीमसेन जोशी कलामंदिर (औंध) ही पुण्यातील महत्त्वाची नाट्यगृहे दुरुस्तीच्या कामांसाठी महिनाभर बंद राहणार आहेत. त्यामुळे रसिकांना महिनाभर सांस्कृतिक कार्यक्रमांना मुकावे लागणार असून, ‘आम्ही कार्यक्रम पाहायचे कुठे’ असा सवाल रसिकांनी उपस्थित केला आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी तिन्ही नाट्यगृहे बंद ठेवण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.
शहरातील सर्वाधिक नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणारे बालगंधर्व रंगमंदिर 16 फेब्रुवारीपासून ते 16 मार्चपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी महिनाभर बंद राहणार आहे. तर श्रीगणेश कला क्रीडा मंच आणि औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर ही दोन नाट्यगृहे ही देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. तिन्ही नाट्यगृहातील महिन्याभरातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ऐन सीझनमध्ये बालगंधर्व रंगमंदिर महिनाभर बंद ठेवण्यात येणार असल्याने रसिकांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजक, नाट्य निर्माते-दिग्दर्शकांमध्ये नाराजी आहे.
बालगंधर्व रंगमंदिर हे वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती, विशेष अतिथी कक्षाचे नूतनीकरण करणे आणि प्रेक्षागृहातील खुर्च्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी बंद असणार आहे. श्रीगणेश कला क्रीडा मंच छत दुरुस्ती, वातानुकूलित यंत्रणेची दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामांसाठी बंद असेल. तर औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर हे नाट्यगृहही दुरुस्तीच्या कामासाठी बंद असेल. – राजेश कामठे,
व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर.
नाट्यगृहातील सोयी – सुविधांबद्दल कलाकारांकडून तक्रारी येत असतात. त्यामुळे कलाकारांच्या सूचनेनुसारच आणि कलाकार – रसिकांना पुढील काळात अडचणी येऊ नयेत, यासाठी देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. नाट्यगृहे तात्पुरत्या कालावधीसाठी बंद असणार आहेत.
– चेतना केरुरे, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, महापालिका.
फेब्रुवारी आणि मार्च हा नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सीझन आहे. ऐन सीझनच्या काळातच बालगंधर्व रंगमंदिर हे देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवणे चुकीचे आहे. पावसाळ्यात हे काम करायला हवे होते. कार्यक्रमांसाठी प्रत्येक संस्था दोन ते तीन महिन्याआधी नियोजन करतात. नाट्यगृहे बंद राहणार असल्याने ज्यांचे या काळात कार्यक्रम आहेत, त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
– सुनील महाजन, सांस्कृतिक कार्यक्रम संयोजक.
बालगंधर्व रंगमंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे नाट्यप्रयोगांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मी जात असतो. कुटुंबासोबत नाट्य प्रयोगांचा आनंद येथे घेता येतो. पण, येथे महिनाभर जर नाट्यगृह बंद असेल तर आम्ही रसिकांनी कार्यक्रम पाहायचे कुठे? कारण या नाट्यगृहात बहुतांश कार्यक्रम होत असतात. आम्हा रसिकांना आता महिनाभर सांस्कृतिक कार्यक्रमांना मुकावे लागणार आहे. कार्यक्रम कमी असणार्या सीझनमध्ये दुरुस्तीचे काम करायला हवे होते.
– श्रीराम बेडकीहाळ, ज्येष्ठ रसिक
हेही वाचा
तीन महिन्यांपासून वेतन नाही; हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी कामगारांची व्यथा
नगर रोड रस्त्यावर दुभाजकांचा अभाव; अपघाताचा धोका
Pune News : पुर्व हवेलीच्या अप्पर तहसीलदारपदी तृप्ती कोलते
Latest Marathi News ऐन सीझनमध्ये नाट्यगृहे बंद का?; रसिकांचा सवाल Brought to You By : Bharat Live News Media.